मुंबई : गानसम्राज्ञी, दीदी, स्वरगोकिळा, गानकोकिळा, भारतरत्न, गान सरस्वती अशा एक ना अनेक ओळखी असणाऱ्या आणि आवाजाला अभिजात स्वरसाज लाभलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी निधन झालं. दीदींच्या जाण्यानं फक्त भारतच नाही आता सारं जग हळहळताना दिसत आहे. देशोदेशीचे दिग्गज दीदींना श्रद्धांजली वाहत आहेत. (Lata Mangeshkar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीदी गेल्या आणि तिथेच वेळ थांबला. एका युगाचा अंत झाल्याची जाणीव झाली. ज्यांच्या आवाजानं कोणासमोरही भावना न दर्शवणारे पंडित जवाहरलाल नेहरूही भावनाविवश झाले त्या म्हणजे या लता मंगेशकर. काळ पुढे गेला, लतादीदींचा आवाज पट्टीच्या गायकांनाही पेचात पाडू लागलेला. जोहराबाई अंबालावाली, शमशाद बेगम यांच्यासारख्या गायिकाही स्पर्धेत मागे होऊ लागलेल्या.


तुम्हाला माहितीये का, 1950 मध्ये दीदींनी जेव्हा ‘आएगा.... आने वाला’ हे गाणं गायलं तेव्हाच्या काळात ऑल इंडिया रेडिओ वर चित्रपट संगीताला बंदी होती. भारतात पहिल्यांदाच रेडिओ गोवा केंद्रावरून दीदींचा आवाज सर्वांनी ऐकला.


गोवा तेव्हा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होतं. 1961 मध्ये ते मुक्त झालं. दीदींच्या गायकिची एक आठवण पंडित जसराज यांनी सांगितली होती. ही तिच वेळ जेव्हा खुद्द बडे गुलाम अली खाँ यांच्या भेटीसाठी पंडित अमृतसरला गेले होते. 


बोलणं सुरु असतानाच तिथे ट्रान्झिस्टरवर लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘ये जिंगदी उसी की है....’ हे गाणं सुरु झालं. गाणं सुरु असतानाच खाँसाहेब थांबले. बोलणं तिथेच थांबलं... गाणं सुरुच राहिलं... गाणं संपताच ते म्हणाले, 'कमबख्त कभी बेसुरी होती ही नहीं'.


बडे गुलाम अली खाँ यांचं वक्तव्य इतरांसाठी भुवया उंचावणारं होतं. पण, जेव्हा हे असं ते म्हणाले तेव्हा मात्र त्यामागच्या भावना समोर आल्या. दीदींच्या आवाजाला त्यांनी दिलेला हा सन्मान होता. एका मोठ्या व्यक्तीनं जणू भारताच्या गानसरस्वतीला दिलेला हा आशीर्वाद होता.