मुंबई : लता मंगेशकर... संपूर्ण जगासाठी, देशासाठी त्या भारत रत्न होत्या. पण, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ यांच्यासाठी मात्र त्या दीदी होत्या. हक्कानं ओरडणारी, काळजी घेणारी आणि योग्य मार्गानं नेणारी थोरली बहीण, ही अशीच व्याख्या त्यांच्या मनात दृढ झाली होती. (Lata Mangeshkar Asha Bhosle)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीदी आणि आशाताई यांच्या नात्यात सारंकाही सुरळीत असताना एक असं वळण आलं जिथे नात्यात मीठाचा खडा पडला. 


आशाताईंनी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केलं आणि नात्याची समीकरणं क्षणात बदलली. त्यांच्या सांगण्यावरून आशाताई कुटुंबीयांपासून दूर होत्या. 


पण, गणपतरावांशी वाद झाला तेव्हा मात्र आशाताई आपल्या कुटुंबाकडे आल्या. त्याआधी हृदयनाथ मंगेशकर आणि माई आशाताईंकडे गेले होते असं लतादीदींनी एका मुलाखतीत सांगितलं. 


आशाताईंना मुलं झाल्यानंतर हे घडलं होतं. पुढे आशाताई मंगेशकर कुटुंबात परतल्या आणि हे वादळ शमलं, मंगेशकर कुटुंबाने घर बदललं आणि कुटुंबाच्या शेजारीच आशाताईंनीही घर घेतलं होतं. 


लता मंगेशकर आणि आशाताईंमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा अनेकांनीच प्रयत्न केला. पण, नात्यांची वीण फारच घट्ट होती ज्यामुळं याचा काही परिणाम झाला नाही. 


पुढे आशाताईंना लतादीदींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आणि तिथे या दोन्ही बहिणींचं नातं किती घट्ट आहे याची जाणीव झाली. 


आशाताईंचा खोडकर स्वभाव आणि दीदींचा धाक हे त्यावेळी सर्वांना पाहता आलं. मुळात आपल्या बहिणीला पुरस्कार देण्याचा तो क्षण अतिशय भावनिक होता असं खुद्द दीदींनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं.



परिस्थितीचा स्वीकार दोघींनीही केला होता, ज्यानंतर कोणाचाही आधार नसताना आशा भोसले यांनी मिळवलेलं यश किती मोठं आहे हे सांगत हा संघर्ष लतादीदींनी सर्वांसमोर आणला. 


 तो क्षण दीदींनाही भावूक करुन गेला, निखळ आनंद देऊन गेला आणि हे आयुष्यभराचं नातं आणखी घट्ट करुन गेला. आपलेही डोळे पाणावणारे ते क्षण पाहून म्हणाल राहिल्या फक्त आठवणी...