Sushant Suicide Case: रियाची आज पुन्हा सीबीआय चौकशी
सीबीआयच्या अनेक प्रश्नांवर रियाला उत्तरं देता आली नसल्याचीही माहिती मिळत आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी, शुक्रवारी सीबीआयच्या टीमने DRDOच्या गेस्ट हाऊसमध्ये रिया चक्रवर्तीची तब्बल 10 तास चौकशी केली. शुक्रवारी सकाळी 11.20 पासून सुरु झालेल्या चौकशीच्या सुरुवातीला 2 तासांपर्यंत सीबीआयने रियाला तिचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं. त्यानंतर सीबीआयने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. शुक्रवारी पहिल्या दिवशी झालेल्या चौकशीत सीबीआयच्या अनेक प्रश्नांवर रियाला उत्तरं देता आली नसल्याचीही माहिती मिळत आहे. आज पुन्हा एकदा रियाची चौकशी होणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रियाला काही तारीख आणि वेळेबाबतही प्रश्न विचारण्यात आले. आज सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा, रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा कुक निरज, दिपेश आणि रिया या सर्वांची समोरासमोर चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सुशांतचा केअर टेकर दिपेश आणि रुममेट सिद्धार्थ पिठानी माफीचे साक्षीदार होणार असल्याची माहिती मिळत आहे. दीपेश आणि सिद्धार्थ हे या तपासातील महत्त्वाचे व्यक्ती मानले जात आहेत. तपासकार्यात त्यांची मोठी मदत होऊ शकते, त्यामुळे ते माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं म्हटलं जात आहे.
यादरम्यान, सुशांतची बहिण श्वेताने रियावर आपल्या भावाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप लावला असून तिने रियाला अटक करण्याची मागणी केली आहे.
अभिनेता सुशांतच्या संपर्कात रिया कशी आली हा प्रश्न सीबीआयकडून रियाला विचारण्यात आला. पहिल्यांदा कधी, कुठे भेटलात, त्या दोघांच नातं कसं होतं, युरोपला जाण्याचं प्लॉनिंग कोणाचं होतं, सुशांत कधी आजारी पडला, कोणत्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले, सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचं कसं समजलं, त्याला कोणती औषधं देण्यात येत होती, यासारखे प्रश्न रियाला सीबीआयकडून विचारण्यात आले.