मुंबई : प्रेमाची परिभाषाही प्रत्येकासाठी निराळी असते. बरेचदा हे प्रेम एकतर्फी असल्याचंही पाहायला मिळालं आहे. आणि या एकतर्फी प्रेमामुळे आलेल्या अडचणी, संकट कित्येकांनी जवळूनही पाहिली आहेत. अशातच एका अनोख्या प्रेमाची आगळीवेगळी लव्हस्टोरी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे. योगेश जाधव दिग्दर्शित प्रेमाची निराळी व्याख्या सांगणाऱ्या या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील कलाकार. चित्रपटाच्या नुकत्याच समोर आलेल्या टिझरने कलाकारांची करून दिलेली ओळख साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर स्वानंदीच्या जोडीला या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रुप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी व सुमेध यांची फ्रेश जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. तर अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.


'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी व कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.  तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.


'मन येड्यागत झालं' या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका नक्कीच चुकवतील यांत शंका नाही. चित्रपटाच्या संगीताची धुरा निलेश पतंगे याने उत्तमरीत्या पेलवली आहे, तर गाणी सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे लिखित आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांनी त्यांचा सुमधुर व दमदार आवाज दिला आहे. स्वानंदी व सुमेध या नव्या जोडीचा नव्या प्रेमाचा रंग 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून येत्या १ मार्चपासून मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.