मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील एक काळ चांगलाच गाजवला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक चुलत भाऊ असून ते ही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चुलत भावाचं नाव पुरुषोत्तम बेर्डे आहे. पुरषोत्तम हे अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. चला तर जाणून घेऊया, बेर्डे कुटूंब हे चित्रपटसृष्टीत कसं आलं आणि त्यांचा हा प्रवास कसा होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जेव्हा त्यांच्या चित्रपटातील करिअरला सुरुवात केली तेव्हा तिच्यासाठी हा काळ फार कठीण होता. ते सतत प्रयत्न करूनही त्यांच्या हाती निराशाच आली होती. लक्ष्मीकांत आणि त्यांचे भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे दोघे कोकणस्थ वैश्य समाजात नाटक बसवायचे.  या दोघांनी मिळून बेर्डे नावाची एक संस्था सुरु केली आणि त्यांची ही संस्था अनेक एकांकिका, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करायची. त्यानंतर पुरुषोत्तम हे जे जे स्कुल ऑफ आर्टस् मध्ये गेले तिथून एकांकिका करत राहिले तर लक्ष्मीकांत बेर्डे साहित्यसंघात नोकरी करत नाटकं करत होते. 


संगीतनाटक, बालनाट्य, तमाशा अशा बऱ्याच प्रोजेक्टमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले, पण त्यांना पाहिजे तेवढं यश मिळालं नाही. त्यानंतर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी टूरटूर हे नाटक लिहिले. यावेळी त्यांनी विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीचा विचार करत नाटक करायचं ठरवलं. नाटकाच्या सुरुवातीच्या 40 व्या प्रयोगापर्यंत प्रेक्षकांकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ठरवलं की त्यांना आणखीन दहा ते बारा वर्षे स्ट्रगल करावा लागेल. हे पाहता पुरुषोत्तम यांनी वेगळ्या पद्धतीनं जाहिरात करायचे ठरवले, त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आणि नाटकाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. 



40 व्या प्रयोगापर्यंत अपयशी ठरलेल्या या नाटकाचे पुढचे 500 प्रयोग यशस्वीपणे झाले. 1983 साली टूरटूर नाटकाच्या यशामुळे कॅमेरामन अरविंद लाड यांना ‘हसली तर फसली’ चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. मात्र काही कारणांमुळे चित्रपट पूर्ण झाला नाही.



टूरटूर हे नाटक यशस्वी ठरल्यानंतर बेर्डे बंधू शांतेचं कार्ट हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. टूरटूर प्रमाणेच या नाटकालाही चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहचलं. 'हमाल दे धमाल' पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट. 'शेम टू शेम', 'हाच सूनबाईचा भाऊ', 'भस्म', 'निशाणी डावा अंगठा', 'जाऊबाई जोरात', 'खंडोबाचं लगीन' अशा अनेक चित्रपट आणि नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. यापैकी बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला. 'अलवार', 'ताविज', 'भस्म' या चित्रपट आणि नाटकांसाठी त्यांना विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.