मुंबई : प्रेक्षक ज्यासाठी उत्सुक आहेत असा बहुचर्चित तुफान विनोदी चित्रपट 'लोच्या झाला रे' या चित्रपटातील 'मेरी गो राउंड' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच आता 'लोच्या झाला रे' मधील 'मेरी गो राऊंड' हे मजेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 


या गाण्यात सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी आणि वैदेही परशुरामी अशी तगडी स्टार कास्ट दिसून येत आहे.  या गाण्यात सिद्धार्थ, अंकुश,वैदेही लंडनमधील निसर्गरम्य ठिकाणी आनंद लुटताना दिसत आहेत तर एका बाजूला प्रेमाचे रंगही उधळताना दिसत आहेत. तिघेही लंडनची सैर करतानाच स्थानिक लोकांची मजा घेतानाही पाहायला मिळत आहेत .


'मेरी गो राऊंड' हे गाणे उत्साहाने, आनंदाने भरलेले आहे. सकारात्मक दृष्टीकोन आयुष्यात किती महत्वाचा हे अधोरेखित करणारे हे गाणे आहे. तरूणांना भुरळ घालणारे हे गाणे मंदार चोळकर यांनी लिहले असून चिनार महेश या गाण्याचे संगीतकार आहेत तर अपेक्षा दांडेकर, हर्षवर्धन वावरे यांचा या गाण्याला  आवाज लाभला आहे . 4 फेब्रुवारी रोजी 'लोच्या झाला रे' चित्रपटगृहात प्रदर्शित  होणार आहे.



  'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी  केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे.


नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.