मुंबई : सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चा आहे ती 'विरूष्का'ची... विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेम कहाणीमुळं जुन्या जमान्यातल्या आणखी एका प्रेमी युगुलाची आठवण ताजी झालीय... त्यांच्या आणि विरूष्काच्या प्रेम कहाणीत बरंच साम्य आहे...


बॉलिवूड आणि क्रिकेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड आणि क्रिकेटचं लग्न ही काही भारतीयांसाठी नवी बातमी नाही... पण तरीही 'विरुष्का'च्या लग्न सोहळ्यातली दृश्यं पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर गुलाब फुलले होते. इटलीच्या रॉयल रिसॉर्टमध्ये रंगलेला सोहळा... देखणा, राजबिंडा विराट कोहली आणि सौंदर्याची खाण असलेली अनुष्का शर्मा... यांची लव्ह स्टोरी लग्न मंडपापर्यंत पोहचेल का? अशी अनेकांना शंका होती. परंतु या परीकथेचा बॉलिवूड सिनेमातल्या हिरो-हिरोईनसारखा हॅप्पी एन्ड (खरी तर सुरुवात) झाला...


टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर

'फ्लॅशबॅक'मधली लव्हस्टोरी...


या रंगीबेरंगी परीकथेमुळं ब्लॅक अँड व्हाइट जमान्यातल्या आणखी एका लव्ह स्टोरीचा फ्लॅशबॅक चाहत्यांच्या मनात रूंजी घालू लागला... ते दाम्पत्य म्हणजे बंगाली ब्युटी शर्मिला टागोर आणि पतौडी संस्थानचा नवाब मन्सूर अली खान पतौडी...


टायगर पतौडी आणि शर्मिला टागोर यांचं प्रेम जुळलं ते ऐन तारूण्यात... विरूष्कासारखंच... १९६५ मध्ये टायगर पतौडी भारतीय क्रिकेट टीमचे सर्वात तरूण कॅप्टन बनले. त्याच वेळी त्यांची ओळख शर्मिला टागोरशी झाली. ती पाहताच बाला, कलेजा खल्लास झाला... अशी या टायगरची अवस्था झाली. 


त्यावेळी शर्मिला यशाच्या शिखरावर होती. या बॉलिवूड राजकन्येला भूरळ घालण्यासाठी नवाब पतौडीला चार वर्षं खस्ता खाव्या लागल्या. कधी फुलांचा छान पुष्पगुच्छ पाठव, तर कधी रेफ्रिजरेटर गिफ्ट म्हणून पाठवून दे... आपल्या प्रेयसीचं मन वळवण्यासाठी या टायगरला खूप पापड लाटावे लागले...


भेट आणि विरह


विरूष्काची पहिली भेट झाली ती एका जाहिरात शूटच्या निमित्तानं... २०१३ मध्ये... दोन तरूण हृदयं एकत्र आल्यानंतर जे होतं, तेच विरूष्काचं झालं... आधी ते एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि हळहळू प्रेमाच्या पाशात गुरफटत गेले. २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर विराटनं विमानतळावरून थेट धाव घेतली ती अनुष्काच्या घरची... एकदा शर्मिला टागोरनंदेखील सिनेमाचं शूटिंग अर्धवट सोडून पतौडीला गुडबाय करण्यासाठी अहमदाबाद विमानतळाकडं धाव घेतली होती.


शर्मिला टागोरच्या प्रेमात पडलेले नवाब पतौडीही अनेकदा चित्रपटांच्या शुटिंगच्या ठिकाणी जायचे. आपला विराटही 'बॉम्बे वेल्वेट'च्या सेटवर अनुष्काला भेटण्यासाठी वारंवार जाऊ लागला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. आयपीएल सीरिज मध्येच सोडून विराट अनुष्काचा २६ वा वाढदिवस साजरा करायला उदयपूरला तिच्या शुटिंगच्या ठिकाणी पोहोचला. २०१४ मध्येच श्रीलंकेविरूद्ध हाफ सेन्चुरी ठोकल्यानंतर विराटनं अनुष्काला पाठवलेला फ्लाईंग किस कोण बरं विसरेल...? २०१५ मध्ये वोग ब्युटी अवार्ड सोहळ्यात विरूष्का हातात हात घालून आले, तेव्हाच त्याची विकेट पडल्याची खात्री पटली.


शर्मिला टागोर - मन्सूर अली खान पतौडी

कहाणीत ट्विस्ट...


फिल्मी कहाणीत जसा मध्येच ट्वीस्ट येतो, तसंच विरूष्का आणि पतौडी-शर्मिलाच्या बाबतीतही झालं. १९६७ मध्ये शर्मिलानं 'अॅन इविनिंग इन पॅरीस' या सिनेमातल्या एका गाण्यात चक्क बिकीनी घातली, त्यावरून बराच वाद झाला. मात्र टायगर पतौडी आपल्या या हिरोईनची बाजूनं ठामपणं उभा राहिला. मध्यंतरी विराटच्या बॅडपॅचच्या वेळी अनेकांनी अनुष्का शर्माला ट्रोल केलं, तेव्हा आपला कॅप्टनही तिच्यामागं खंबीर उभा राहिल्याचं जगानं पाहिलं.


भारतीय क्रिकेटमधला महान कर्णधार अशी त्याकाळी नवाब पतौडीची ओळख होती. सध्याचा विराट कोहलीचा फॉर्म पाहता, त्यानं हे बिरूद आधीच कमावलंय. ईएसपीएन आणि फोर्ब्ससारख्या ब्रँड्सनी जगातला सर्वात प्रसिद्ध अॅथलीट म्हणून विराटचा गौरव केलाय. 


लग्न झाल्यानंतर शर्मिला टागोरनं बॉलिवूडमधून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. याउलट अनुष्का शर्मा मात्र बॉलिवूडमधली कारकीर्द सुरूच ठेवणार आहे. जानेवारीत ती पुन्हा एकदा शुटिंग सुरू करतेय. पुढच्या वर्षी परी, सुई धागा असे तिचे चित्रपट प्रदर्शित होतायत. विराटप्रमाणंच बॉलिवूडमधली अनुष्काची इनिंगदेखील सुपरहिट वेगानं सुरू आहे.
शर्मिला आणि नवाब पतौडी यांची लव्ह स्टोरी सक्सेसफुल ठरली... त्यांच्याप्रमाणं विराट आणि अनुष्काची जोडीही यशस्वी ठरणार... कारण ती देखील रब ने बना दी जोडी आहे... असंच त्यांच्या चाहत्यांची खात्री आहे.