मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. येत्या 28 एप्रिलला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सिनेमाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलर आणि टीझरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद, 'बहरला हा मधुमास...' या गाण्याला मिळालेली ५ दशलक्ष दर्शकसंख्या आणि एक लाखाहूनही अधिक तयार झालेल्या रील्स या माध्यमातून 'महाराष्ट्र शाहीर'चे स्वागत प्रेक्षकांनी प्रदर्शनापूर्वीच केले आहे. बेला केदार शिंदे प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेला आणि केदार शिंदे यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २८ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 


महाराष्ट्राचे लाडके लोककलाकार शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात शाहिरांची भूमिका आजचा आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी सकारात असल्याने रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवत असलेले आघाडीचे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांची गाणी चित्रपटाचे आकर्षण असून या सांगीतिक पर्वणीसाठीही चित्रपट चर्चेत आहे. अलीकडच्या काळातील एक बिग बजेट चित्रपट म्हणून 'महाराष्ट्र शाहीर'कडे पाहिलं जात आहे. 


शाहीर साबळे यांच्या आठव्या स्मृतीदिनी २० मार्च रोजी या चित्रपटाच्या टीझरचे विमोचन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख श्री राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. ११ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांच्या हस्ते ट्रेलर प्रदर्शित झाला. महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. ट्रेलर आणि टीझरला फार मोठ्या प्रमाणावर रसिकांकडून प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट दर्जेदार गाणी, भावनिक तसेच सामाजिक-राजकीय प्रसंगांमधून सर्वांगसुंदर झाला आहे, याची झलक ट्रेलर आणि टीझरमधून मिळते. 


'बहरला हा मधुमास नवा, आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमली रे....' हे शाहिरांवर चित्रित झालेले प्रेमगीत सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत असून ते संगीत क्षेत्रात ट्रेंडींग आहे. अजय-अतुल यांच्या इतर गाण्यांबद्दलही त्यामुळे उत्सुकता लागून राहिली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'महाराष्ट्र शाहीर'चे निर्माते आहेत संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे! चित्रपटाचे लेखन ज्येष्ठ लेखिका व दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांचे आहे. शाहिरांच्या प्रमुख भूमिकेत अंकुश चौधरी आहे तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत सना केदार शिंदे आहे.