मुंबई : भारतीय कलाविश्व आणि मुख्य म्हणजे मराठी रंगभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या दिवंगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाकडून पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नटसम्राट श्रीराम लागू' असं या पुरस्काराचं नाव असेल. जो मराठी कलाजगत आणि मुख्य म्हणजे रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना प्रदान करण्यात येणार आहे. 


सांस्कृतिक मंत्रालयाचा हवाला देत 'एएनआय' या वृत्तसंस्थेकडून याविषयीची माहिती देण्यात आली. २०१९ या वर्षी डिसेंबर महिन्यात डॉ. लागू यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांचं जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं. पण, अद्वितीय अशा कलाकृतींच्या माध्यमातून त्यांचा वावर हा कलाकारांना आणि चाहत्यांना कायमच त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारा ठरत आहे. त्यातच आता या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्यामुळे नवोदित कलाकारांसाठी आणि रंगभूमीसाठी कमालीची मेहनत घेणाऱ्यांसाठी हा एक प्रेरणास्त्रोतच ठरणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 



डॉ. लागू यांनी सुमारे १२५हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. वैद्यकीय व्यवसायात असले तरी त्यांना अभिनयाविषयी अधिक आवड होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या डॉक्टरी पेशाला रामराम ठोकत १९६९मध्ये वसंत कानेटकरांच्या 'येथे ओशाळला मृत्यू' या नाटकापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.  



पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल


डॉ. लागूंची अभिनय कारकिर्द ही कायमच हेवा वाटण्याजोगी. वैद्यकिय क्षेत्रापासून अभिनय विश्वापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यात आलेले चढउतार आणि तरीही त्यात तग धरुन उभा असणारा हा नटसम्राट म्हणजे एक वेहळं रसायन. 'सिंहासन', 'पिंजरा', 'मुक्ता' या त्यांच्या चित्रपटांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. अनेक हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.