मुंबई : आज समाजातील महिला वेगवेगळ्या उच्च पदांवर बेधडकपणे काम करतात. याचं सर्व श्रेय क्रांतीज्योती ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई यांनाच जातं. त्यांच्या जीवनावर आधारित 'सत्यशोधक' या चित्रपटाचं टिझर लॉन्च आज (ता. २४) खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या चित्रपटात ज्योतिरावांच्या प्रमुख भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी ब्रिगेड-भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'सत्यशोधक संमेलन' आयोजित करण्यात आलं आहे. यानिमित्ताने संमेलनात 'सत्यशोधक' या चित्रपटाचं टिझर लॉन्च करण्यात आलं आहे. या संमलेनाचे उद्घाटक खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते हा टिझर लॉन्च करण्यात आला. 'विद्येविना मती गेली, मतिविना निती गेली...' अशा कठोर शब्दांत शिक्षणाचं महत्त्व सांगणाऱ्या ज्योतिरावांच्या आयुष्यातील संघर्ष आता मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.


येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अभिनेते संदीप कुलकर्णींसह राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. या टिझर लॉन्च सोहळ्याला वामन मेश्राम, प्रवीण गायकवाड, बाबा आढाव, मा. म. देशमुख, आ. रोहित पवार, व्ही. व्ही. जाधव, अॅड. वासंतीताई नलावडे, विठ्ठलदादा सातव, डॉ. जे. के. पवार उपस्थित होते.



समता फिल्म्स प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपटाचं निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूर वाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे,प्रतिका बनसोडे आणि प्रमोद काळे हे आहेत. महेश भारंबे, शिवा बागुल हे कार्यकारी निर्माते आहेत. 'सत्यशोधक' हा चित्रपट आगामी दिवाळीत आपल्या भेटीला येईल.


समाजाला योग्य दिशा दाखवणारे, जातीपातींमधील भेदभावावर बोट ठेवणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, त्याची सुरुवात आपल्या घरापासून करणारे समाजाला योग्य वाटेवर नेण्यासाठी स्वतःचा देह झिजवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांची संपूर्ण जीवनगाथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.


या चित्रपटात अभिनेते संदीप कुलकर्णी हे महात्मांच्या भूमिकेत दिसणारा आहेत. संदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी 'डोंबिवली फास्ट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली. त्यांनी 'दुनियादारी' या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केलं होतं. त्यांची भूमिका कमी असली तरी त्यांनी तिथेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ते महात्मा फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहेत.