मुंबई : मराठी सिनेसृष्टीने बॉलिवूडकरांना भुरळ घातलीच आहे. आता बॉलिवूडकर मंडळी हळूहळू मराठी संस्कृतीशी देखील जोडत असल्याचा प्रत्यय येत आहे. 'दशावतार' हा महाराष्ट्रातील सर्वात जुना लोककलेचा प्रकार. तळ कोकणात सादर केली जाणारी ही कला. या कलेवर लवकरच मराठी सिनेमा होऊ घातला आहे. महत्वाचं म्हणजे या सिनेमासाठी दिग्दर्शक महेश भट्ट उत्सुक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दशावताराला मध्यवर्ती ठेवून 'पिकासो' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सर्वात जुनी अशी ही लोककला पुन्हा एकदा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा देणार आहे. कोकणात दशावताराचा एक वेगळा इतिहास आहे. खूप पिढ्यांनी ही लोककला जपली आहे आणि याचा वारसा आजही पुढे चालला आहे. 



राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता प्रसाद ओक या सिनेमात मुख्य भूमिकेत असून सिनेमाचं पोस्टर लाँच झालं आहे. दशावतार नाटकात ज्याप्रमाणे चेहऱ्यावर मेकअप करून कला सादर केली जाते त्यामुळे प्रसाद ओकने आपला चेहरा रंगवला आहे. त्या खाली एक लहान मुलगा बसला आहे, असं या सिनेमाचं पोस्टर आहे. 


या सिनेमाच्या दिग्दर्शन आणि लेखनाची धुरा अभिजीत मोहन वारंग यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येणार आहे. महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं पोस्टर बॉलिवूडमधील दिग्दर्शक महेश भट्ट यांनी शेअर केलं आहे, यावरून या सिनेमाची उत्सुकता किती आहे हे आपल्याला कळतंच.