मुंबई : लैंगिक शोषण, अत्याचार या दुष्कृत्यांविरोधात बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आवाज उठवला गेल्याचं पाहायल मिळालं. अनेक अभिनेत्रींनी पुढे येत #MeToo या चळवळीअंतर्गत त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली. 
कित्येक वर्षे या एकाच गोष्टीचं दडपण घेऊन जगणाऱ्या अनेकजणींच्या गौप्यस्फोटामुळे कलाविश्वातील काही प्रसिद्ध प्रस्थांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. एकंदरच या विषयाला मिळणारी चालना पाहता कलाकार मंडळींनीही या चळवळीची प्रशंसा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशंसनीय ठरणाऱ्या #MeToo ला काहींनी मात्र तितकंसं गांभीर्याने न घेतल्याचंही पाहायला मिळालं. #MeToo हे एक फॅड असल्याचं मत एका अभिनेत्याने नुकतच मांडलं आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते मोहनलाल यांनी असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


दाक्षिणात्य विशेषत: मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनीसुद्धा त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषण  आणि अत्याचारांच्या प्रसंगांविषयी वाच्यता केली होती. त्याचसंदर्भात जेव्हा मोहनलाल यांना युएई येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पत्रकार परिषदेत याविषयीचा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं. 


मल्याळम चित्रपटसृष्टीत काहीच गैर नसल्याचं म्हणत, #MeToo कडे एक चळवळ म्हणून पाहू नका, असं मत त्यांनी मांडलं. 'हे एक फॅड असून आता त्याची फॅशनच होत आहे. एक अशी फॅशन जी बऱ्याच काळासाठी टीकून असेल', असं ते म्हणाले. 


#MeToo विषयीच्या प्रश्नांची उत्तरं देतेवेळी त्यांनी बरीच काळजीही घेतली. त्याशिवाय या प्रकरणी आपल्याला फार काही माहिती नसल्याचं म्हणत त्यांनी काही प्रश्न टाळण्याचाही प्रयत्न केला. आपण याविषयी फार काही बोलण्यापेक्षा ज्यांच्यासोबत हे सारं घडलं आहे, त्यांनीच याविषयी बोलावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. 



मोहनलाल हे 'अम्मा' म्हणजेच 'असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टीस्ट्स'च्या अध्यक्षपदी असून, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे. अभिनेत्रीवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण ज्या पद्धतीने 'अम्मा'कडून हाताळण्यात आलं त्य़ावर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली. 


वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'अम्मा'चे अध्यक्ष आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्याचं वक्तव्य पाहता आता यावर काय प्रतिक्रिया उमटणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.