मणिकर्णिका चित्रपटाची ४ दिवसात ४८ कोटींची कमाई
मणिकर्णिका चित्रपटाचा तिकीट बारीवर बोलबाला
मुंबई : कंगनाच्या मणिकर्णिका चित्रपटाचा तिकीट बारीवर चांगलाच बोलबाला आहे. झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या या चित्रपटानं ४ दिवसात ४८ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ९ कोटी, दुसऱ्या दिवशी १८ कोटी, तिसऱ्या दिवशी १५ कोटी, तर चौथ्या दिवशी सुमारे ५ कोटींची कमाई केली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात कंगना प्रमुख भूमिकेत आहे. कंगनानं सिनेमात झाशीच्या राणीची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी तसंच समीक्षकांनी कौतुक केलं आहे.
राधा कृष्ण जगरालमुडी आणि कंगना रानौतने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात १८५७ चा रणसंग्राम आणि झाशीच्या राणीच्या पराक्रमावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मुख्य म्हणजे क्वीन कंगनाच्या या चित्रपटाला देशभरात बऱ्याच स्क्रीनमध्ये जास्तीत जास्त शो मिळाले आहेत.
'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या सिनेमात कंगनासोबत अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, जीशू सुरेश ओबेरॉय हे कलाकारही आहेत.