संजू लढवय्या आहे, ही वेळही निघून जाईल - मान्यता दत्त
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मुंबई : अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचं समोर आल्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच अभिनेत्याचे चाहते निराश झाले आहेत. संजय लवकरच परदेशात उपचारासाठी जाण्याची शक्यता आहे. संजय दत्तला कर्करोग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता त्यावर पत्नी मान्यता दत्तने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
मान्यताने म्हटलं की, 'संजयच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. या कठीण काळातून जाण्यासाठी आम्हाला सामर्थ्य आणि प्रार्थना हव्या आहेत. गेल्या काही वर्षांत आमचे कुटुंब बर्याच समस्यांमधून गेले आहे. पण माझा विश्वास आहे की ही वेळही निघून जाईल. माझं संजूच्या चाहत्यांना आवाहन आहे, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपलं प्रेम आणि समर्थन देऊन आम्हाला मदत करा.'
संजू नेहमीच लढत राहिला आहे आणि आमचा कौटुंबिक सेनापती आहे. देवाने पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतली आहे. आम्ही या आव्हानाला कसे सामोरे जाणार हे त्यांना पहायचे आहे. आम्हाला फक्त आपली प्रार्थना आणि आशीर्वाद हवेत. आम्हाला माहित आहे की आम्ही जिंकू. आम्ही नेहमी जिंकत आलो आहे. या संधीचा प्रकाश आणि सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी उपयोग करूया.'
8 ऑगस्ट रोजी छातीत दुखत असल्याने आणि श्वास घेण्यात अडचण आल्याच्या तक्रारीनंतर संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, संजय यांना दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. या अभिनेत्याची कोरोना टेस्ट देखील झाली होती, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला. घरी परतल्यानंतर संजय दत्तने ट्वीट करून कामातून ब्रेक घेतल्याची माहिती दिली. त्याने लिहिले- मित्रांनो, मी वैद्यकीय उपचारासाठी एक छोटा ब्रेक घेत आहे. माझे मित्र आणि कुटुंबीय माझ्यासोबत आहेत. माझ्या प्रियजनांनी निराश होऊ नये. कोणतेही अनुमान काढू नये. तुमचं प्रेम व प्रार्थनेने मी लवकरच परत येईन'