Ankush Chaudhari New Movie : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अंकुश चौधरीला ओळखले जाते. मराठी सिनेइंडस्ट्रीतला स्टाईल आयकॉन म्हणून तो सातत्याने चर्चेत असतो. 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमामुळे सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या अंकुशने मागे वळून पाहिले नाही. 'धुरळा', 'दगडी चाळ', 'ट्रिपल सीट', 'डबल सीट', 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटानंतर आता अंकुश चौधरी एका नवीन चित्रपटात झळकणार आहे. त्याने स्वत: याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंकुश चौधरीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. यात अंकुश चौधरीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या अंकुशच्या हातात डमरू आणि नजरेत क्रोध पाहायला मिळत आहे. तर त्याच्या पाठीमागे भगवान शिवशंकर पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर चित्रपटाचे नावही लिहिण्यात आले आहे. महादेव असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. 


महादेवाच्या मंदिरात पार पडला पोस्टरचा अनावरण सोहळा


"शिवशंभुचा हात माथी, भक्त महादेवाचा.. संहार करण्या दुर्जनांचा, घेई अवतार रुद्राचा ..." महाशिवरात्रीचे औचित्य साधून सादर करीत आहोत 'महादेव' चे मोशन पोस्टर! 'महादेव', लवकरच प्रेक्षकांना भेटीला, असे कॅप्शन अंकुश चौधरीने या पोस्टला दिले आहे. या चित्रपटात महादेवाचे कोणते रूप पाहायला मिळणार आहे, हे येत्या काळात उलगडणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा महादेवाच्या मंदिरात पार पडला. 



"आजच्या शुभदिनी आम्ही या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आणत असून अंकुशसारखा अष्टपैलू अभिनेता यात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या आधी कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा तो या चित्रपटात साकारणार आहे. सध्या तरी चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकणार नाही. परंतु 'महादेव'मध्ये प्रेक्षकांना फॅन्टॅसी, ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे", अशी प्रतिक्रिया या चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस लोखंडे यांनी दिली.


अंकुश चौधरी झळकणार प्रमुख भूमिकेत


या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत याचे दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केले आहे. तर याची निर्मिती जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर यांनी केली आहे. संदीप दंडवते लिखित या चित्रपटाचे संदीप बाबुराव काळे, अमेय संदेश नवलकर (शुभारंभ मोशन पिक्चर्स) सहनिर्माते आहेत.