`एक वर्षापूर्वी मी पुन्हा...`, कॅन्सरवर मात केल्यानंतर अतुल परचुरेंनी सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग
हा व्हिडीओ ‘झी मराठी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील आहे. याला ‘एका अवलियाची गोष्ट’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.
Atul Parchure Zee Award Comeback : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून अतुल परचुरे यांना ओळखले जाते. मालिका, चित्रपट आणि नाटक अशा सर्वत्र क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द करणाऱ्या अतुल परचुरेंनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. काही वर्षांपूर्वी अतुल परचुरे यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागलं होतं. पण त्यांनी या कठीण प्रसंगावर मोठ्या जिद्दीने मात केली. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झी मराठीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘झी मराठी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्यातील आहे. याला ‘एका अवलियाची गोष्ट’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात अतुल परचुरेंच्या ‘खरं खरं सांग’ या नाटकातील एक अंक सादर करण्यात आला. या नाटकाच्या निमित्ताने अतुल परचुरेंनी पुन्हा रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचा अंक सादर करतेवेळी सुनील बर्वे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर हे विविध पात्र साकारताना दिसत आहे.
अतुल परचुरेंचा आदरसत्कार
या नाटकाचा अंक सादर झाल्यानंतर अतुल परचुरेंचा सत्कार करण्यात आला. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर यशस्वीपणे मात करून पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीत कमबॅक केल्याने त्यांचा आदरसत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर सुनील बर्वे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर यांसारखे दिग्गज कलाकार उपस्थित होते. यावेळी अतुल परचुरेंनी भावूक होत त्यांचे मनोगत व्यक्त केले.
अतुल परचुरे काय म्हणाले?
“बरोबर एक वर्षापूर्वी मी पुन्हा उभा राहू शकेन की नाही? याची मला स्वत:लाही गॅरंटी नव्हती. पण, आज मी इथे आहे तो फक्त तुम्हा सर्वांमुळे…” असे अतुल परचुरे म्हणाले. त्यासोबतच अतुल परचुरेंनी रंगमंचावर डोकं टेकवून आशीर्वादही घेतला. त्यांचे हे मनोगत ऐकल्यानंतर उपस्थित असलेले सर्वच कलाकार भावूक झाले. यावेळी महेश मांजरेकरांनी अतुल परचुरेंना मिठी मारली.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. दरम्यान ‘झी नाट्य गौरव 2024’ या पुरस्कार सोहळा 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केला जाणार आहे. यावेळी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यात येणार आहे.