दोन मुलं, पत्नीला मागे ठेवत अभिनेत्याची अकाली एक्झिट; 17 वर्षांनंतरही लोकप्रियता कायम
अनेकांच्याच मनाला चटका लागला.
मुंबई : 90 च्या दशकामध्ये लोकप्रिय चित्रपटांच्या माध्यमातून एक चेहरा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. हा चेहरा फक्त हिंदीच नव्हे, तर मराठी चित्रपटांच्या दुनियेतही कमाल करत होता. कोणालाही कल्पना नसताना या अभिनेत्यानं जगाचा निरोप घेतला आणि अनेकांच्याच मनाला चटका लागला.
हसरा चेहरा, जबरदस्त विनोदबुद्धी आणि तितकाच दमदार अंदाज असंच व्यक्तीमत्त्वं असणारा हा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. 16 डिसेंबर 2004 ला या कलाकारानं जगाचा निरोप घेतला.
बेर्डे यांच्या निधनाला 17 वर्षांता काळ उलटून गेला असला तरीही त्यांच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झालेली नाही.
लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या कलाकृतींसोबतच आणखी एका कारणामुळेही चर्चेत होते. हे कारण होतं त्यांचं खासगी आयुष्य.
1998 मध्ये त्यांनी अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी लग्न केलं. स्क्रीनवर एकत्र झळकणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. स्वानंदी आणि अभिनय अशा दोन चिमुकल्यांनी त्यांच्या कुटुंबाची चौकट पूर्ण केली.
मराठी आणि हिंदी कलाजगत गाजवणारा हा हरहुन्नरी चेहरा किडनीच्या आजारामुळं या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून गेला आणि सारंकाही तिथेच थांबलं.
कुटुंबासाठी त्यांचं जाणं हा मोठा आघात होता. पण, त्यातूनच सावरत प्रिया अरुण अर्थात प्रिया बेर्डे यांनी हा प्रवास पुढे सुरुच ठेवला. आजच्या घडीला लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय हा त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेताना दिसत आहे.