`मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरुन त्याच्यावर ओरडायचं...`, मिलिंद गवळींनी सांगितला `त्या` चित्रपटातील अनुभव
मिलिंद गवळी यांनी नुकतंच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
Milind Gawali Experience With Laxmikant Berde : मराठमोळे अभिनेते मिलिंद गवळी यांनी आतापर्यंत विविध नाटक, मालिका, चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारताना दिसत आहे. मिलिंद गवळी यांनी नुकतंच दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी 'मराठा बटालियन' या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम केले होते. आता मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी चित्रपटादरम्यानचे एक दृश्य शेअर केले आहे. तसेच त्यांनी या चित्रपटाबद्दलच्या काही खास आठवणीही सांगितल्या आहेत.
मिलिंद गवळी यांची पोस्ट
"लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, रमेश भाटकर मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतले दिग्गज असे कलाकार, ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर “मराठा बटालियन” मध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली, या सिनेमांमध्ये मला अमर भोसले च्या भूमिकेसाठी घेण्यात आलं, हा व्हिडिओ जो मी upload केला आहे तो माझा या चित्रपटातला पहिलाच सीन होता, मराठीतल्या सुपरस्टारला हाताला धरून त्याच्यावर ओरडायचं होतं, पहिलाच दिवस पहिला सीन, नाशिकच्या कुठल्यातरी डोंगरात शूटिंग, दडपण आलं होतं, कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी “ आपण रिहर्सल करूया “ असं मला सांगून, मला comfort table केलं, हा सीन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं.
अख्या shooting भर हसत खेळत मजा मस्ती करत हा "मराठा बटालियन" त्यांनी पूर्ण केला, विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासून ची घट्ट मैत्री होतीच, त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे , सतत हस्त खेळत वातावरण ठेवायचे. विजू मामांबरोबर मी जवळजवळ आठ एक सिनेमे केले, मराठी इंडस्ट्री मधले ते सगळ्यात बिझी स्टार होते, ऐकावेळेला त्यांचे सहा सात सिनेमे चालूच असायचे, असा हा एकमेव स्टार होता ज्याच्या डबिंग साठी, ‘ते‘ जिथे shooting करत असतील, तिथे अरेंजमेंट, तिथे डबिंग स्टुडिओ बुक केला जायचा, बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही, त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता, फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होते, “ तू तू मी मी “ या एका नाटकात त्यांनी 14 भूमिका केल्या होत्या,
रमेश भाटकर तर stylised स्टार होते , आणि फार भारी कलाकार पण होते ते, या तिघांनीही माझ्यावर खूप प्रेम केलं, मला खूप प्रोत्साहन दिलं , कौतुक केलं , हे तिघेही दिग्गजच होते , पण कधीही त्यांनी, गर्व केला नाही, उलट आमच्यासारख्या नवोदित कलाकाराला खूप सांभाळून घेऊन कामं केली. सिनेमांचे जुने सीन्स बघत असताना सतत असं वाटतं की ते आपल्यामध्ये आहेत ते आपल्याला सोडून गेलेच नाहीयेत, त्यांच्याबरोबर काम करणं मी सतत miss करत असतो, प्रेक्षकांच्या मनामध्ये तर त्यांनी त्यांची जागा निर्माण केलीच आहे. पण माझ्या मनामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी जागा आहे ! ते आता जिथे कुठे असतील , तिथे सुद्धा ते एकमेकांची खेचत असतील मस्करी करत असतील, आजूबाजूंच्यांचं पोट दुखेपर्यंत त्यांना हसवत असतील, आनंद पसरवत असतील", असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
दरम्यान 'मराठा बटालियन' या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर, विजय चव्हाण, मिलिंद गवळी, भरत जाधव, अलका जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागेर दरक यांनी केले होते.