Prithvik Pratap Instagram Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातून अनेक कलाकार हे प्रसिद्धीझोतात आले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब यांसारख्या अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. यातील एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप. तो सध्या त्याच्या डिलिव्हरी बॉय या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्याने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीक प्रतापने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने डिलिव्हरी बॉय या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्याबरोबरच त्याने चित्रपटाच्या शूटींगदरम्यानचा एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने मोठ्या पडद्यावर  स्वत:ला पाहून कसं वाटतं, याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. 


पृथ्वीक प्रतापने व्यक्त केल्या भावना


"आपलं आयुष्य एक कथा आहे… त्याला सुरुवात आहे, मध्य आहे आणि त्याला शेवट सुद्धा आहे. फक्त स्वतःवर आणि पटकथेवर विश्वास ठेवून मेहनत केली की आयुष्याचा सिनेमा नशीबाच्या बॅाक्स ॲाफिसवर चालतो म्हणजे चालतोच. आज माझ्या आयुष्याची पटकथा महत्त्वाचं वळण घेतेय, रुपेरी पडद्यावर इतरांना पाहत मोठा झालो आणि आज मी स्वतः त्या रुपेरी पडद्याचा भाग झालोय. आमचा सिनेमा ‘डिलीवरी बॅाय’ आज संपूर्ण महाराष्ट्रात रीलीज होतोय.


हा सिनेमा तुम्ही थिएटर ला जाऊन पाहा… त्याच्यावर भरभरून प्रेम करा… २०० स्क्रीन आणि ६०० शो ज तुमची वाट पाहतायत… तुम्ही प्रेक्षक माझ्या या सुद्धा कलाकृतीवर भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे कारण एक गोष्ट मला कळलीये…. प्रयत्न प्रामाणिक असतील आणि त्याला मेहनतीची जोड असेल तर… आपल्या आयुष्याच्या सिनेमाला Happy Ending च असणार. आज पासून तुम्ही आमच्या ‘Delivery Boy’ बाळाचे मायबाप!" असे पृथ्वीक प्रतापने म्हटले आहे. 



पृथ्वीक प्रतापच्या या पोस्टवर प्रथमेश परबने कमेंट केली आहे. 'खूप प्रेम भावा....असच मेहनत करत रहा...तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार....आय लव्ह यू', असे प्रथमेश परबने म्हटले आहे. तर शिवाली परबने 'अभिनंदन पीपी' अशी कमेंट केली आहे. दरम्यान ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहसिन खान यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडेपाटील हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. पृथ्वीकचा हा पहिलाच चित्रपट आहे.