Amruta Khanvilkar Ankita lokhande Friendship : छोट्या पडद्यावरील संस्कारी सून म्हणून अभिनेत्री अंकिता लोखंडेला ओळखले जाते. पवित्र रिश्ता या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. या कार्यक्रमात तिने अर्चना हे पात्र साकारले होते. त्यासोबतच काही महिन्यांपूर्वी बिग बॉस हिंदीच्या 17 व्या पर्वातही ती झळकली. सध्या अंकिता ही स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अंकिताने वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. आता अंकिताची खास मैत्रीण आणि अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्याबद्दल एक वक्तव्य केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता खानविलकर आणि अंकिता लोखंडे या दोघीही एकमेकांच्या फार पूर्वीपासून मैत्रिणी आहेत. अमृता ही अंकिता-विकीच्या लग्नातही सहभागी झाली होती. तसेच अंकिता लोखंडेसाठी अमृता ही 'बिग बॉस'च्या घरातही पोहोचली होती. यासोबतच अमृताने वारंवार अंकितासाठी स्टोरी, पोस्ट शेअर करत तिला खंबीर राहण्यासाठी आवाहन केले होते. आता अमृताने एका मुलाखतीत त्यांच्या मैत्रीबद्दल भाष्य केले आहे. 


अंकिता लोखंडेसोबतच्या मैत्रीबद्दल खुलासा 


अमृता खानविलकरने नुकतंच इन्स्टंट बॉलिवूडला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यासह विविध गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तिने दिलखुलासपणे भाष्य केले. यावेळी तिला अंकिता लोखंडेसोबतची मैत्री आणि बिग बॉसचा कार्यक्रम याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 


"बिग बॉसमध्ये जे दाखवलं जातं, ते अर्धसत्य असतं. तुम्ही जे बघता ते नक्कीच खरं असतं. पण त्याची दुसरीही बाजू असते, जी तुम्ही पाहता येत नाही. बिग बॉसमध्ये असं झालं, बिग बॉसमध्ये तसं झालं, असं लोक आपलं आयुष्य जगत नाही. मी अंकिता लोखंडेला कायमच पाठिंबा देते. गेल्या 20 वर्षांपासून ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. ती बिग बॉस करु दे किंवा इतर काहीही करु दे, मी तिला नेहमीच पाठिंबा देणार. हे नक्की", असे अमृता खानविलकरने म्हटले आहे. 


सध्या 'लुटेरा' वेबसीरिजमुळे चर्चेत


दरम्यान सध्या अमृता ही 'लुटेरा' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. शुक्रवारी 22 मार्चपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. यामध्ये अमृता खानविलकरसह रजत कपूर, दीपक तिजोरी, विवेक गोंबर,आमिर अली आणि चंदन रॉय सन्याल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत. त्यासोबतच ती 'कलावती', 'पठ्ठे बापूराव', 'ललिता बाबर' या चित्रपटांमध्येही काम करताना दिसणार आहे.