मुंबई : विक्रम चंद्रा यांच्या पुस्तकावर आधारित कथेचा आधार घेत साकारण्यात आलेली वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स' अतिशय कमी वेळात प्रेक्षकांमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. साधारण वर्षभरापूर्वी नेटफ्लिक्सच्या या ओरिजिनल सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. ज्यानंतर प्रेक्षकांमध्ये  त्याच्या पुढील भागाची कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरिजविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच अखेरच 'सेक्रेड गेम्स २'च्या पर्वाची घोषणा झाली. पाहता पाहता या भागातील नवी पात्र आणि ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबतच ज्याप्रमाणे या सीरिजच्या पहिल्या पर्वात मराठी कलाकारांची वर्णी लागली होती, त्याचप्रमाणे दुसऱ्या पर्वातही काही मराठमोळे चेहरे पाहता येणार आहेत. 


खुद्द या कलाकारांनीच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली. अभिनेत्री अमृता सुभाष हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये तिने या सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळण्याचा आनंद व्यक्त केला आणि आपण साकारत असलेलं पात्रही सर्वांच्या भेटीला आणलं. अमृताचा अभिनय आणि ती साकारत असलेल्या 'कुसुम देवी यादव' या भूमिकेची झलक पाहता 'सेक्रेड गेम्स २' तीसुद्धा गाजवणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.