`का रे दुरावा...` म्हणतं मराठमोळ्या अभिनेत्रीची नवी इनिंग
अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार
मुंबई : आपल्या अभिनयाने मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट बॉलिवूडपर्यंत झेप घेणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नवी इनिंगला सुरूवात झाली आहे. प्रेमाची अंगठी हातात घालून मराठी अभिनेत्री अर्चना निपाणकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अर्चनाने नुकतेच आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'पानिपत' या सिनेमात राघोबादादा पेशवे यांची पत्नी आनंदीबाई यांची भूमिका अभिनेत्री अर्चना निपाणकर यांनी साकारली आहे. अर्चनाच्या या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली. आता या अभिनेत्रीने आपल्या 11 वर्षाच्या मित्रासोबत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी आहे अर्चनाची लव्हस्टोरी
अर्चना आणि पार्थ यांची पहिली ओळख अकरावीमध्ये असताना झाली. पार्थ विज्ञान शाखेत तर अर्चना वाणिज्य शाखेत शिकत होती. कॉमन मित्रांच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. त्या भेटी दरम्यानच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
काही काळ एकत्र घालवल्यावर आपण खूप कमी वयात प्रेमात पडलो. आपण या गोष्टीसाठी अजून लहान आहोत. याची जाणीव झाल्यावर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकमेकांचा काही संबंध नव्हता. पण ती प्रेमाची भावना मात्र मनात घर करून होती.
त्यानंतर अर्चना 'का रे दुरावा' मालिकेच्या शुटिंगकरता मुंबईत आली. याच दरम्यान दोघांचा पुन्हा एकदा संबंध आला. पार्थ देखील कामानिमित्त मुंबईत येत असल्याचं कळलं. अंधेरीत अवघ्या 5 मीटरच्या अंतरावर राहत असलेल्या अर्चना आणि पार्थची पुन्हा एकदा नव्याने ओळख झाली. पुन्हा या नात्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. साडेतीन वर्ष हे नातं पुन्हा पुढे घेऊन गेलो. पण कालांतराने तेव्हा ही गोष्ट वर्कआऊट झाली नाही.
पुढे अर्चना सांगते की,'पण तुमची डेस्टिनी ठरलेली असते. ही गोष्ट आमच्या लक्षात आली. तुम्ही काहीही करा पण जर तुमचं नातं ठरलेलं असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. असंच काहीस माझ्या आणि पार्थच्या नात्यात झालं.'
अर्चना निपाणकर आपला जवळचा मित्र पार्थ रामनाथपूरसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. 3 जानेवारी रोजी अतिशय खासगी पद्धतीने साखरपुड्याचा सोहळा संपन्न झाला. मूळचा नाशिकचा असलेला पार्थ रामनाथपूर हा तमिळ आहे. पार्थ मुंबईच्या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून कार्यरत आहे.
अर्चना आणि पार्थचा अगदी जवळच्या व्यक्तींसोबत घरच्या घरी हा साखरपुडा संपन्न झाला. पार्थचा भाऊ न्यूझीलंडला असल्यामुळे त्याच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करायचा होता. 2020 मध्येच लग्न करण्याचा दोघांचा मानस आहे.