Ashwini Mahangade Brother Upsarpanch : मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत तिने अनघा हे पात्र साकारले आहे. ती नेहमीच तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आता अश्विनीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अश्विनीचा भाऊ बद्रीनाथ महांगडेची उपसरपंचपदी निवड झाली आहे. याबद्दल तिने पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी महांगडेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा भाऊ बद्रीनाथ हा उपसरपंच झाल्याचे सांगितले आहे. त्यासोबत तिने त्याचा गुलालाने माखलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच एका फोटोत तो ग्रामदैवताचे आशीर्वाद घेतानाही दिसत आहेत. अश्विनी महांगडेचा भाऊ बद्रीनाथ महांगडे हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावाचा उपसरपंच झाला आहे. 


अश्विनी महांगडेने दिल्या शुभेच्छा


"बद्री... तू फार संयमी बाबा... शांत आणि फक्त शांत. तू आज पसरणी गावचे उपसरपंच म्हणून पदभार स्विकरल्याबद्दल अभिनंदन.... तुझ्या हातून नानांच्या आशीर्वादाने उतमोत्तम कामे व्हावी.. आपल्याला राजकारणाचा वसा देणाऱ्या नानांनी समाजासाठी कामी येणे किती महत्त्वाचे आहे हेच कायम मनी रुजवले. आज या महत्त्वाच्या घटनेसाठी जे जे तुझ्यापाठी उभे राहिले त्यांची मी कायम ऋणी राहीन...", असे अश्विनी महांगडेने म्हटले आहे. 



जुन्या आठवणींना दिला उजाळा


त्याबरोबरच अश्विनीने जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. यात तिने तिचा भाऊ बद्रीनाथ हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याचे फोटो शेअर केले आहेत. "आज आठवणींना थोडा उजाळा...., बद्री ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला त्या दिवशी हा फोटो काढला होता. राजकारणाचे धडे गिरवायचे तर सुरुवात होते ती याच निवडणुकीपासून. नाना कायम म्हणायचे विरोध हा फक्त निवडणुकीपुरताच मर्यादित ठेवावा. कारण निवडून आलेला माणूस हा सगळ्यांचा असतो, जे मत देत नाहीत त्यांचाही. राजकारणाला कायम समाजकारणाची जोड हवी. कारण हा सगळा पसारा फक्त आणि फक्त समाजासाठी उत्तम काम करता यावे या साठी असतो. आम्ही तयार झालो नानांच्या तालमीत. बद्री.... अभिनंदन, शुभेच्छा आणि आशीर्वाद...", असे अश्विनी महांगडे म्हणाली. 



दरम्यान अश्विनीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या पोस्टवर एकाने "हार्दिक अभिनंदन दादासाहेब" असे म्हटले आहे. तर एकाने "अभिनंदन आणि शुभेच्छा दादा" अशी कमेंट केली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.