`तुझी खूप आठवण येईल बाबा...`, `टाईमपास` फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन
मेघना एरंडेने हॅरी पॉटरच्या सीरिजपासून निंजा हातोडी, नॉडी यांसारख्या अनेक कार्टुनच्या पात्रांना आवाज दिला आहे. सर्वांना आपल्या आवाजाने भूरळ घालणाऱ्या मेघना एरंडेच्या वडिलांचे निधन झाले आहे.
Meghana Erande Father Death : लोकप्रिय डबिंग आर्टिस्ट म्हणून नावाजलेली अभिनेत्री म्हणून मेघना एरंडेला ओळखले जाते. मेघना एरंडेने हॅरी पॉटरच्या सीरिजपासून निंजा हातोडी, नॉडी यांसारख्या अनेक कार्टुनच्या पात्रांना आवाज दिला आहे. सर्वांना आपल्या आवाजाने भूरळ घालणाऱ्या मेघना एरंडेच्या वडिलांचे निधन झाले आहे. सुधीर एरंडे असे तिच्या वडिलांचे नाव आहे. तिने स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
मेघना एरंडने पोस्ट शेअर करत दिली माहिती
मेघना एरंडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने वडिलांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. "मी अत्यंत जड अंतःकरणाने तुम्हा सर्वांना कळवू इच्छिते की, माझे वडील सुधीर एरंडे यांचे 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. ते खरोखरच एक रत्न होते. एक अतिशय प्रेमळ व्यक्ती.... तुझी खूप आठवण येईल बाबा. ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो! ओम शांती", अशी पोस्ट मेघना एरंडेने केली आहे.
या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता पुष्कर जोगने यावर कमेंट करत "भावपूर्ण श्रद्धांजली, मी लवकरच तुला भेटायला येईन. तोपर्यंत काळजी घे", असे म्हटले आहे. तर अभिनेता अभिजीत खांडकेकरने "भावपूर्ण श्रद्धांजली", असे म्हटले आहे. त्यासोबतच सोनाली कुलकर्णीने "मी मनापासून त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. काळजी घे" असे म्हटले आहे.
दरम्यान मेघना एरंडे ही सिनेसृष्टीत कायमच चर्चेत असते. लोकप्रिय डबिंग आर्टिस्ट म्हणून तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डबिंग आर्टिस्टसोबतच ती उत्तम अभिनेत्रीही आहे. टाईमपास या चित्रपटात तिने प्राजुच्या आईची भूमिका साकारली होती. तिने शिनचॅन, निंजा हातोडी, नॉडी, बॉब द बिल्डर, पोकेमॉन, डोरेमॉन यांसारख्या अनेक कार्टुन्सला तिने आवाज दिला आहे. तिचा बोलका चेहरा, विनोदाचं उत्तम टायमिंग यांच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.