`...म्हणून मी असा पोशाख केला`, रुचिरा जाधवने दिले स्पष्टीकरण
रुचिरा जाधव ही तिच्या स्पष्टपणासाठी ओळखली जाते. आता नुकतंच रुचिरा जाधवने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.
Ruchira Jadhav Troll : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड लूक आणि सौंदर्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधवला ओळखले जाते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. रुचिरा जाधव ही तिच्या स्पष्टपणासाठी ओळखली जाते. आता नुकतंच रुचिरा जाधवने ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर दिले आहे.
रुचिरा जाधवने ईदनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. यावेळी तिने ईद मुबारक, एका ट्रॅव्हल शोसाठी बहरीनमध्ये शूटिंग करताना खूप छान अनुभव आला, असे म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला ट्रोल केले. “ईद मुबारक वैगरे कशाला? मराठी सण आहेत एवढे मग हे कशाला??” अशी कमेंट एकाने केली होती. “अनफॉलो”, “हिला अनफॉलो करा” अशा कमेंटही अनेकांनी केल्या होत्या. यावरुन रुचिराने स्पष्ट शब्दात मोठी पोस्ट शेअर करत कमेंट केली आहे.
रुचिरा जाधवची पोस्ट
सोशल मीडियावर मला इतक्या मोठ्या प्रमाणाता मिळणारा द्वेष पाहून खरंच धक्का बसला. मी डेनिम, स्कार्फ आणि शेड्स असलेली कुर्ती परिधान केली होती. हा माझा ‘पोशाख’ आहे. मी जे करतेय ते माझं काम आहे. कर्म आणि धर्म ‘पूर्णपणे समजणाऱ्यांसाठी ही पोस्ट आहे. बाकीच्या लोकांना काय बोलावं हे मला खरंच कळत नाहीये. महाराजांचा उल्लेख करणाऱ्यांना विचारायचंय, ‘महाराजांनी कधी दुसऱ्या धर्माचा निरादर करायला शिकवलं’? ज्या लोकांनी माझ्या इन्स्टाग्राम बायोसंदर्भात प्रश्न उपस्थित केले त्यांना “गीतेतला कर्मयोग समजला असता, तर तुमची reaction वेगळी असती” तुमच्या भावनांचा आदर आहेच पण, याचा अर्थ असा नाही की, तुमचा दृष्टीकोन प्रत्येक वेळी योग्य असावा. हरे कृष्णा… PS : मी काय करतेय हे मला माहिती आहे.” अशा शब्दात रुचिराने ट्रोल करणाऱ्यांना सुनवले आहे.
दरम्यान रुचिरा जाधवने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत माया हे पात्र साकारले होते. यामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. काही दिवसांपूर्वी तिने ‘ठरलं तर मग’ मालिकेत एक लहानशी भूमिका साकारली होती. तसेच काही दिवसांपूर्वी तिने नवीन घर आणि गाडी खरेदी केली आहे. ती सोशल मीडियावरही सतत सक्रीय असते.