बंगाली - मराठी पद्धतीनं सईचं शुभमंगल
सई सोमवारी अडकली विवाहबंधनात
मुंबई : अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटामाटात बंगाली मुलगा तिर्थदीप रॉयसोबत (Tirthdeep Roy) लग्नगाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नकार्यातील प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत होती. आज अखेर तिने तिर्थदीपसोबत लग्नगाठ बांधली आहे.
सोमवारी म्हणजे ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. २९ नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं होतं. त्याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
सईनं लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यामुळं विवाहाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. बिग बॉसनंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती.
सईचा लाइफ पार्टनर कोण असेल, याबद्दलही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. तिर्थदीप रॉय असं सईच्या पतीचं नाव आहे. तिर्थदीप सिनेनिर्माता असल्याची माहिती आहे.