सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे. सईने अनेक मालिका, चित्रपट, वेबसीरिजमध्ये हटके भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. तिने साकारलेल्या विविध भूमिकांचे प्रचंड कौतुक पाहायला मिळाले. नुकतंच सई ताम्हणकरने तिच्याकडे कानाडोळा करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सई ताम्हणकर ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर सईने मराठी चित्रपट ते बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. सईने नुकतंच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या करिअरबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला "गेल्या वर्षात तू खूप विविध भूमिका साकारल्या. पण काही निवडक लोक सोडले तर अनेकांनी तुझ्या गुणवत्तेकडे कानाडोळा केला, असं तुला वाटतं का?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने फारच स्पष्टपणे उत्तर दिले. यावर उत्तर देताना ती म्हणाली, "मला त्यांना सांगायचंच की, कोण हरतंय बघू या? तुम्ही का मी? कारण कानाडोळा करणं हे अगोदरपासूनच आहे. हे माझ्यासाठी नवीन नाही."


"मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, हे जोपर्यंत मला माहितीये, तोपर्यंत मला इतर कोणीही माझ्या यशापासून दूर करु शकत नाही. माझा प्रामाणिकपणा, माझी मेहनत, माझा अजेंडा तुम्ही माझ्यापासून हिरावू शकत नाही. मी तुम्हाला सतत सिद्ध करुन दाखवणारच . एके दिवशी तुम्हाला माझी, माझ्या कामाची प्रशंसा करावीच लागेल", असे सईने म्हटले. 



"दुनियादारी चित्रपटानंतर मला अनेकांचे फोन आले. लोकं भेटली. ज्यांना मी पूर्वी आवडायचे नाही, मी केवळ एक ग्लॅम डॉल दिसायचे, त्यांचं मत परिवर्तन मी माझ्या कामातून तेव्हा केलंच होतं. दहा वर्षानंतर का होईना पण,  बी. ई. रोजगार च्या निमित्ताने पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. हां... ही बघ सई आली इथपासून, सई तू आलीस...कशी आहेस. या प्रतिसादातील बदलासाठी मी अपार कष्ट घेतले आहेत. हा खूप प्रदीर्घ असा प्रवास होता", असेही तिने यावेळी सांगितले. 


दरम्यान सई ताम्हणकरने 'या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती अग्निहोत्र, साथी रे, कस्तुरी यांसारख्या मालिकांमध्ये विविध भूमिकेत दिसली. तिने मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ यांसारखे नावाजलेले पुरस्कार तिने पटकावले. रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं.