मुंबई :  लगीनघाई म्हटलं, की लगबग, घाई गडबड, खरेदी, गोंधळ, उत्साह असंच एकंदर वातावरण पाहायला मिळतं. लग्न ठरण्यापासून ते थेट लग्नाचा दिवस उजाडण्यापर्यंतचा काळ हा बऱ्याच घडामोडींचा, रागरुसव्यांचा आणि नात्यातील ओलावा जपण्याचा असतो. त्यातच लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बस्ता म्हणजे काय, आता हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मानपान आणि नातेवाईकांची पसंती या अनुशंगाने होणारे बहुविध वस्तूंची विशेषत: कपड्यांची खरेदी आणि बरंच काही म्हणजे बस्ता. सध्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सायली संजीव हिसुद्धा या बस्त्यामुळेच चर्चेत आहे. 


बरं, सायलीच्या लग्नाविषयीचे तर्क लावण्यास तुम्ही सुरुवात केली असेल तर तं नाहीये. इथे चर्चा सुरु आहे ती म्हणदे सायली संजीव हिच्या आगामी चित्रपटाची. बस्त्याची खरेदी ही जितकी गमतीदार गोष्ट असते, असाच गमतीदार आणि रंगतदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेल्या 'बस्ता' या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यावर सायली नववधू रुपात दिसत आहे. चेहऱ्यावर अनोखं तेज असणाऱ्या सायलीला पाहता तिचा हा 'बस्ता' नेमका कसा असेल याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 



सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी "बस्ता" चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, तानाजी घाडगे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटातून सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव असे कलाकार झळकणार आहेत.