केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतके महिने ओलांडले असले तरी त्याची क्रेझ अद्याप कायम आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला महिला वर्गानं अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटातील प्रत्येकाची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता ‘बाईपण भारी देवा’मधील साधना काकडे म्हणजेच अभिनेत्री सुकन्या मोनेंनी एक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबरोबरच त्यांनी याची दखल कोणी घेईल का? असा प्रश्नही विचारला आहे. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुकन्या मोने या इन्स्टाग्रामवर सतत सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी एक व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ एका जत्रेचा आहे. या जत्रेत काही लहान मुलांच्या अंगाला रंग फासून त्यांना पैसे मागण्यासाठी उभं करण्यात आलं आहे. यात जत्रेत येणारी जाणारी माणसं ही त्यांच्या समोर असलेल्या बास्केटमध्ये पैसे टाकताना दिसत आहेत. हा सर्व प्रकार सोलापूरमधील असल्याचे सांगितले जात आहे. 


यात एक माणूस हा या सर्व धक्कादायक प्रकाराबद्दल सांगताना दिसत आहे. या जत्रेत जवळपास 50 पेक्षा जास्त मुलं ही अशाप्रकारे रंगवलेल्या अवस्थेत होती. पोलीस प्रशासन या ठिकाणी फेऱ्या मारताना दिसत आहेत. पण यावर कोणीही आक्षेप घेत नाही, असा दावा या व्हिडीओद्वारे करण्यात आला आहे. 



सुकन्या मोनेंचा संताप


सुकन्या मोने यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. "मला एका what's app group वर हा video आला आणि अस्वस्थ झाले. सदर मुले ही आपणा पैकीच कोणाची तरी बेपत्ता झालेली असु शकतात? कुठलेच माय-बाप आपल्या मुला-मुलींना अश्या पद्धतीने पैश्यांन साठी उघड्याने नाही सोडत, हे सगळे संशयस्पद आहे..!! कोणी ह्याची दखल घेईल का?" असा प्रश्न सुकन्या मोनेंनी केला आहे. 


सुकन्या मोनेंच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बालकांच्या तस्करीच्या प्रकरणातील वाटत आहे, असे एकाने म्हटलं आहे. तर एकाने यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, असे म्हटले आहे. दरम्यान सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओही व्हायरल होत आहे.