राज ठाकरेंबद्दल बोलताना महेश मांजरेकरांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले `त्याने या राज्याची...`
आता महेश मांजरेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
Mahesh Manjrekar Comment Raj thackeray : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते म्हणून महेश मांजरेकरांना ओळखले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून महेश मांजरेकर हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. महेश मांजरेकरांनी मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे. महेश मांजरेकर हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. ते त्यांचे मत परखडपणे मांडत असतात. आता महेश मांजरेकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे.
महेश मांजरेकर आणि राज ठाकरे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आता नुकतंच महेश मांजरेकरांनी 'लोकमत फिल्मी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलताना एक इच्छा व्यक्त केली. यासोबतच त्यांनी ते राज ठाकरेंना कोणत्या नावाने आवाज देतात, याबद्दलही सांगितले.
महेश मांजरेकर काय म्हणाले?
"मी त्याला राजा म्हणतो आणि त्याने तो हक्क मला दिला आहे. मी कधी काही वेगळं बोललो की तो लगेच मला राजा म्हण असे म्हणतो. त्याच्यासारखा मित्र नाही. कधी अडचणीला फक्त एक फोन लांब असलेला व्यक्ती म्हणजे माझ्यासाठी राजा आहे. माझ्या ओळखीतील खऱ्या अर्थाने दिलदार असलेला माणूस म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेला मला या राज्याची धुरा सांभाळताना बघायचं आहे. तो आपल्या राज्याला वेगळा दर्जा मिळवून देईल, याची माझी खात्री आहे," असे महेश मांजरेकर म्हणाले.
‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद
दरम्यान सध्या महेश मांजरेकर हे त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा बहुचर्चित ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती महेश मांजरेकरांनी केली होती. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगावले हे प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात
आता सध्या महेश मांजरेकर हे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.