VIDEO : `पांडू`- `काशी` आमनेसामने येताच नेटकरी सुस्साट....
`पांडू-काशी`च्या जुगलबंदीचा खेळ चाले....
मुंबई : विविध विषय, कित्येकदा विषय तेच पण मांडणीत विविधता किंवा मग अनेकदा सारंकाही नवं अशा अनेक मार्गांनी मालिका विश्व प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतं. हिंदीप्रमाणेच मराठी मालिकांचाही विशेष असा प्रेक्षकवर्ग आहे. ज्या वर्गात काही मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. अशाच मालिकांमधील एक नाव म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. पहिल्या पर्वाला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतर या मालिकेचं दुसरं पर्वही रसिकांच्या भेटीला आलं.
मालिकेच्या या पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली असून, मालिकेच्या पुढच्या भागात नेमकं होणार तरी काय याचच कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळतं. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे.
रसिकांमध्ये विशेष गाजलेल्या या मालिकेतील पात्रांपैकी दोन नावं म्हणजे 'पांडू' आणि 'काशी'. त्यांच्या पात्रांची नावं घेताच समोर उभा राहतो तो 'इसरलंय....' म्हणणारा 'पांडू' आणि 'गोळीयो घालीन....' असं वारंवार म्हणत अण्णा नाईक असल्याचं भासवणारा काशी. आता हे दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले तर, नेमकं काय होईल, याचा विचार केला का तुम्ही? मालिकेत पार पडलेल्या एका भागात 'काशी' आणि 'पांडू' एकमेकांसमोर उभे ठाकले होते. रसिकांसाठी हा भाग अधिक मनोरंजक ठरला होता.