Trailer : सेक्स, इंटिमसी.... आणि बरंच काही; प्रेक्षकांच्या भेटीला Safe Journeys
नकार.... हा खरंच नकार असतो का?
मुंबई : सोशल मीडिया, त्यामाध्यमातून मिळणारी माहिती किंवा अनेक अशा मुद्द्यांवर खुलेपणाने होणाऱ्या चर्चा ज्या सहसा काही वर्षांपूर्वी तुलनेने कमी व्हायच्या हे गणित हल्लीच्या पिढीला अगदी सुरेखपणे उमगलं आहे. पण, तरीही काही वर्गांमध्ये आताच्या घडीलाही सेक्स, लग्नापूर्वी होणारे शारीरिक संबंध अशा मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलण्यात काहीसा संकोचलेपणा पाहायला मिळतो. अर्थात दोन व्यक्तींमध्ये हा संवाद होणं नेमकं किती महत्त्वाचं आहे आणि त्याविषयीचे कोणकोणते न्यूनगंड अनेकांच्याच मनात घर करुन आहेत, यावर एका वेब सीरिजच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येत आहे. 'सेफ जर्नीज' असं या मराठमोळ्या वेब सीरिजचं नाव असून या सीरिजच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्यात येत आहे.
पर्ण पेठे, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे यांसारखे तरुणाईच्या आवडीचे कलाकार यातून झळकणार आहेत. आठ लघुपट आणि लघुकथांच्या माध्यमातून ही एकंदर सीरिज प्रेक्षकांसमोर उलगलं जाणार आहे. 'प्रयास हेल्थ ग्रुप'च्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या या वेब सीरिजच्या प्रोजेक्टला 'टेक्नो पीर प्रोजेक्ट' असं नावही देण्यात आलं आहे.
जवळपास दहा मिनिटांच्या प्रत्येक लघुपटात सुरक्षित शरीरसंबंध, हस्तमैथुन, पॉर्नफिल्म्सच्या आहारी जाणं, शारीरिक संबंधांच्या वेळी घ्यायचे काही निर्णय, निर्णयक्षमता, मानसिक संतुलन, अवेळी गर्भधारणा अशा अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. लहान मुलांवर होणारे अत्याचार आणि अशा इतर मुद्द्यांचाही यात सहभाग असणार आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कलाकारांचा हा प्रयोग आता कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. .
अनुपम बर्वे दिग्दर्शित या वेब सीरिजसाठी वैभव अबनावेचंही सहकार्य लाभलं आहे. कलाकारांच्या साथीने, अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालत तितक्याच प्रभावीपणे हे विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा साऱ्यांचा प्रयत्न आहे.