तेलुगू सिनेसृष्टीबद्दल राधिका आपटेचे रोखठोक वक्तव्य, म्हणाली...
राधिकाच्या तिच्या बोल्ड लूकसह रोखठोक वक्तव्यासाठीही ओळखलं जाते. राधिकाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर जोरदार टीका केली आहे
अभिनेत्री राधिका आपटेला तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने मराठी, हिंदी यासह तेलुगू, तमिळ यांसारख्या बहुभाषिक चित्रपटात काम केले आहे. राधिकाने हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राधिका ही चित्रपटांसोबतच ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. राधिकाच्या तिच्या बोल्ड लूकसह रोखठोक वक्तव्यासाठीही ओळखलं जाते. आता राधिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यात ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर जोरदार टीका करताना दिसत आहे.
राधिका आपटेने काही वर्षांपूर्वी पत्रकार राजीव मसंद यांना एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान तिला सिनेसृष्टीबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांना तिने स्पष्ट शब्दात उत्तर दिली. आता याच मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती तेलुगू सिनेसृष्टीबद्दल भाष्य करताना दिसत आहे.
तेलुगू सिनेसृष्टी ही पितृसत्ताक
"मला सिनेसृष्टीत सर्वाधिक जास्त संघर्ष हा तेलुगू सिनेसृष्टीत करावा लागला. कारण तेलुगू सिनेसृष्टी ही पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान आहे. यातील चित्रपटात महिलेला चांगला दर्जा मिळत असला तरी प्रत्यक्षात सेटवर मात्र वेगळं चित्र पाहायला मिळतं. या ठिकाणी पुरुष कलाकारांकडून महिला कलाकारांना दिली जाणारी वागणूक ही वेगळी असते. तुम्ही ती सहन करु शकत नाही. सेटवर ते कलाकार तुमची विचारपूसही करत नाहीत. अनेकदा सेटवर सांगितले जाते की, अभिनेत्याच्या मूड चांगला नाही, त्याला चहा प्यायची आहे. मला या काळात खूप संघर्ष करावा लागला. पण आता मी हे सर्व सोडून दिले आहे. कारण हे फक्त माझ्याच बाबतीत घडतंय", असं मला वाटतं, असे विधान राधिका आपटेने यावेळी केले.
राधिका आपटेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. तेलुगू इंडस्ट्रीला बदनाम करण्याचा प्रयत्न, अशी कमेंट एकाने यावर केली आहे. तर एकाने तुझ्या अशा वागण्यामुळेच टॉलिवूडला तुझी गरज नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान राधिका आपटेने मराठी नाटकांमधून सिनेसृष्टीत पदार्पण केले. वाह लाईफ हो तो ऐसी या चित्रपटाद्वारे तिने हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर राधिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. राधिकाने समांतर या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर ती हंटर, पॅडमॅन, कबाली, कौन कितने पानी मै या चित्रपटात झळकली. राधिकाने सेक्रेड गेम्स या सीरिजमध्ये साकारलेली अंजली माथूर या रॉ एजंटची भूमिका चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच आलेल्या मेरी ख्रिसमस या चित्रपटातही ती झळकली होती.