मुंबई : कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्या चे नवीन पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.


येत्या भागात थुकरटवाडीत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री सई ताम्हणकर येणार आहेत. सुबोध भावे त्याचा आगामी चित्रपट 'एक निर्णय' आणि सई तिच्या झी फाईव्ह वरील डेट विथ सई या वेबसिरीजच्या निमित्ताने थुकरट वाडीत सज्ज होणार आहे. विक्रांत आणि ईशा यांचं शाही लग्न हा चर्चेचा विषय होता आणि त्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीजना बोलावलं नाही म्हणून बॉलिवूडच्या कलाकारांनी निषेध व्यक्त करणार आहेत. सर्व बॉलिवूडचे कलाकार थुकरटवाडीत 'माझा वट्टा' या कार्यक्रमात येणार आहेत.


विनोदवीर एकच कल्ला करणार आहेत त्यामुळे प्रेक्षक हसून लोटपोट होणार हे नक्की. त्यामुळे ही सर्व धमाल पाहायला विसरू नका १४ आणि १५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!