मुंबई: #MeToo विषयी हिंदी आणि मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी खुलेपणाने वक्तव्य केलं. फक्त अभिनेत्रीच नव्हे तर अभिनेते मंडळींनीसुद्धा मोहिमेत सहभागी होत महिला वर्गाला पाठिंबा दर्शवला. मुख्य म्हणजे या मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाच्या ज्या घटनांना वाचा फोडली गेली त्यातून अशा काही व्यक्तींची नावं समोर आली जी पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या यादीतील असंच एक नाव म्हणजे 'संस्कारी बाबुजी' फेम अभिनेते आलोकनाथ यांचं. आलोकनाथ यांच्यावर एका लेखिकेने बलात्काराचा आरोप केला होता. 


ज्येष्ठ अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या आलोकनाथ यांच्याविषयी अनेकांनीच नाराजीचा सूरही आळवला. ज्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेही ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 


'तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही, तुम्ही नरकातच सडणार', असं ट्विट सईनं करत विनता नंदा आणि मी टू मोहीमेला पाठिंबा दर्शवला. 


तिच्या या ट्विटच्या चर्चा झाल्यानंतर अनेकांनीच या विषयालवा एक वेगळं वळण देत एका जुन्या प्रकरणाविषयीच्या चर्चांना सुरुवात केली. 


एका युजरने ‘आहो पण पुण्यात फ्लॅटमध्ये रात्री दारु पिऊन जो धिंगाणा घातलेला त्याचंही बोला जरा’, असं ट्विट केलं.


चर्चेला फुटलेला हा फाटा पाहून सईनेही त्या युजरला सडेतोड उत्तर दिलं. 'त्या' पार्टी प्रकरणाहून महत्त्वाचं इथे काहीतरी घडू पाहात आहे. असो ते समजण्याची तुझी कुवत आणि मानसिक पातळी नाही....' असं ट्विट तिने केलं. 


तिचं हे ट्विट आणि सदर प्रकरणाविषयीची भूमिका पाहता आपली बाजू अगदी चांगल्या पद्धतीने तिने मांडली असून त्यातून अवाजवी चर्चेला वाव देणाऱ्या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 





काय होतं पुण्यातील दारु पार्टी प्रकरण?


एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 2011 मध्ये कोथरुडमधील निलांबरी सोसायटी येथे झालेल्या एका पार्टीमध्ये काही मराठी कलाकारांनी मद्याच्या नशेत धिंगाणा केला होता. दिग्दर्शक श्रीरंग गोडबोलेंचा मुलगा सुरूद गोडबोले, सौरभ देशमुख, अभिषेक शेट्टी, अजिंक्य खांबेकर, अमेय गोसावी यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. 


मुख्य म्हणजे या पार्टीला अभिनेत्री सई ताम्हणकरशिवाय इतर चार महिलाही हजर होत्या. परंतु घटनास्थळी महिला पोलीस नसल्यामुळे सई आणि तिच्यासोबत असणाऱ्या चार महिलांवर पोलिसांना कारवाई करता आली नव्हती. 


दारुच्या नशेत या सर्व कलाकारांनी धिंगाणा घातला होता. यामध्ये स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करुनही त्यांना शिवीगाळ करण्यात आली होती. त्यावेळी कलाकारांमध्ये असणाऱ्या महिला वगळता पुरुषांना पोलिसांनी अटक केली होती. 


एक रात्र पोलिस कोठडीत काढल्यानंतर 10 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.