मुंबई : काही कलाकार हे जन्मत:च दैवी देणगी घेऊन आलेले असतात असं म्हणतात. मुळात अशा कलाकारांची समाजाला ओळख मात्र फारच उशिरानं होते. हे दुर्दैव असलं तरीही ते वास्तव आहे, जे नाकारता येणं अशक्य. अशाच एका कलाकाराच्या जीवनावर, त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकत एक चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गलिच्छ गायकी म्हणत या गायकाला समाजमान्यता मिळणार नाही, असं म्हणत हिणवलंही गेलं. पण, त्यामुळं न खचता आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी या गायकानं खस्ताही खाल्या आणि अखेर नावलौकिकसुद्धा. 


अनेक अडचणी आणि अडथळे पार करत, दिग्गजांच्या सानिध्ध्यात स्वत:ला घडवणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे, पंडित वसंतराव देशपांडे. 


माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं, असं म्हणणाऱ्या वसंतरावांचा जीवनप्रवास त्यांचा नातू राहुल देशपांडे यानं साकारला आहे. चित्रपटाचं नाव आहे, 'मी वसंतराव.'


मध्यवर्ती भूमिकेत झळकण्यासोबतच राहुलनं चित्रपटाच्या संगीताचीही जबाबदारी सांभाळली आहे. 


आजोबांकडून मिळालेला कलेचा वारसा त्यांच्याच भूमिकेच्या माध्यमातून सादर करण्याहून मोठं सुख काय, हीच भावना राहुल देशपांडेच्या चेहऱ्यावर चित्रपटाचा ट्रेलर पाहताना लक्षात येत आहे. 


वसंतराव आपल्याला कळले, उमगले तसेच मांडण्याचा सुरेख प्रयत्न त्यानं इथं केला आहे. मराठी गायनक्षेत्रातील एक सुवर्णकाळ, मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि पुलंचा वावर या चित्रपटातून साकारण्यात आला आहे. 



कलासक्त कलाकाराची तळमळ आणि त्यातूनच घडत जाणारी व्यक्ती 'मी वसंतराव'च्या निमित्तानं आपल्याला पाहता येणार आहे. 


1 एप्रिलला, म्हणजेच मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या वर्षाची सुरेल सुरुवात करण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?