`सेल्फीसाठी भर रस्त्यात... हे ठिक नाही...` मिलिंद सोमण ट्रोल
अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायम त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो.
मुंबई : अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण कायम त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. फक्त मिलिंदचं नाही तर, त्याचं कुटुंब देखील अत्यंत फिटनेस फ्रिक आहे. शिवाय तो सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो शेअर करत चाहत्यांना देखील फिट राहाण्यासाठी सल्ला देत असतो. शिवाय मिलिंद सोशल मीडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना फिटनेसबद्दल टिप्स देखील देत असतो. आता देखील मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये एक महिला पुशअप्स करताना दिसत आहे.
व्हिडिओ पोस्ट करत मिलिंदने कॅप्शनमध्ये, 'सेल्फी घेण्यासाठी माझा आवडता पुशअप्स. मी एका बाजारात होतो. रायपूरमध्ये ज्याठिकाणी लोक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. तेथे या महिलेने मला सेल्फीसाठी विचारलं. मी त्या महिलेला म्हणालो 10 पुशअप्स तेव्हा त्या महिलेने कोणताही विचार न करता, मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करेपर्यंत 10 पुशअप्स पूर्ण केलं. '
पुढे मलिंद म्हणाला, 'ना साडीची चिंता आणि आजू-बाजूला असलेल्या लोकांची काळजी... त्या महिलेने पुशअप्स पूर्ण केले. कधी-कधी तुम्हाला आनंदी जीवनासाठी सक्षम होण्याची फार गरज असते. फक्त तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुमच्यात फक्त हो बोलण्याची क्षमता लागते.' सध्या मिलिंदने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिलिंदने शेअर केलेला हा व्हिडिओ काही लोकांना आवडला आहे, तर काहींनी मात्र यावर राग व्यक्त केला आहे. 'सेल्फीसाठी भर रस्त्यात असं करणं हे ठिक नाही. एका महिलेला भर रस्त्यात साडीमध्ये पुशअप्स...' असं म्हणत नेटकऱ्यांनी मिलिंदला ट्रोल केलं आहे.