मुंबई : गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, अदनान सामीला पुरस्कार देण्यास मनसेने तीव्र विरोध केला आहे. अदनान सामी हा मूळ भारतीय कलाकार नाही असं मनसेचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याला दिलेला पुरस्कार रद्द करावा अशी मागणी मनसेने केली आहे. अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेने कडाडून विरोध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत अदनान सामीला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद आहे पण २०१५ मध्ये मोदींच्या काळात भारतीय नागरिकत्व मिळालेल्या अदनान सामीला लगेच चार वर्षात पद्मश्री बहाल का करण्यात आला असा सवाल, अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.



मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये असं मनसेचं ठाम मत असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलंय. या पुरस्काराचा मनसेने निषेध केला असून पुरस्कार रदद् करण्याची मागणी केली आहे.



दरम्यान, अदनान सामीने पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले आहेत. 


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्या वतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ जणांना पद्म विभूषण, १६ जणांना पद्म भूषण तर ११८ जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.


पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेल्या अदनान सामीने २६ मे २०१५ रोजी गृह मंत्रालयाला मानवाधिकारच्या हक्कांतर्गत भारतात राहण्यासाठी परवानगी मागितली होती.