Atif Aslam : पाकिस्तानी कलाकारांना मनसेने कायमच कडाडून विरोध केला आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांविरोधात तीव्र विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना काम देऊ नये तसेच च रेडिओ वाहिन्यांनी पाकिस्तानी कलाकारांची गाणी वाजवू नयेत असा इशारा मनसेने दिला होता. तसेच टी-सीरीजने देखील पाकिस्तानी गायक अतिफ अस्लमचे 'किन्ना सोना' हे गाणे यूट्यूब चॅनलवरून हटवले होते. त्यानंतर आता पुन्हा अतिफ अस्लम बॉलिवुडमध्ये गाणं गाणार आहे. मनसेने पुन्हा त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी गायक अतिफ अस्लम सात वर्षांनंतर भारतीय चित्रपटात गाणं गाणार आहे. लव्ह स्टोरी ऑफ 90 या आगामी चित्रपटातील गाणं गाण्याची ऑफर अतिफ अस्लमला देण्यात आली आहे. अतिफ अस्लमने ‘टायगर जिंदा है’ या सलमान खानच्या चित्रपटात शेवटचं गाणं गायलं होतं. मात्र 2016 मध्ये उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपट उद्योगात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा अतिफ अस्लम बॉलिवुड चित्रपटासाठी गाणं गाणार असल्याचे समोर आल्याने मनसेने रोष व्यक्त केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बॉलिवूडकरांना इशारा दिला आहे.


काय म्हणाले अमेय खोपकर?


"अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल. पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय," असे अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.



कोर्टाच्या निर्णयानंतरही मनसेचा विरोध


2016 मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशनने सुरक्षा आणि देशभक्तीचे कारण देत पाकिस्तानच्या कलाकारांना काम करण्यास मनाई केली होती. त्यानंतर फवाद खान, माहिरा खान, अली जफर आणि राहत फतेह अली खान हे बॉलिवुडपटांमध्ये दिसले नाहीत. मात्र ऑक्टोबर 2023 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने सांस्कृतिक सौहार्द, एकता असे म्हणत ही बंदी उठवली. परदेशी लोकांना, विशेषत: शेजारील देशांतील नागरिकांचा विरोध करणे देशभक्ती दाखवत नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. मात्र आता कोर्टाच्या निर्णयानंतर मनसेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध कायम असल्याचे दिसत आहे.