फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक दरम्यान मॉडेलचा मृत्यू
कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
नवी दिल्ली : फॅशन शो दरम्यान अनेक मॉडेलसोबत कित्येकदा अनेक घटना घडल्याचं समोर आलं आहे. मॉडेलच्या कपड्यांमुळे, त्यांच्या हाय हिल्समुळे अनेकदा काही हादसे झाल्याच्या अनेक बातम्या दाखवल्या जातात. परंतु ब्राझीलमध्ये रनवेवर वॉक करण्यासाठी जाताना एका मॉडेलचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. साओ पाओलो फॅशन वीकच्या शेवटच्या दिवशी शनिवारी कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तेथील मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रनवेसाठी जाताना २६ वर्षीय मॉडेल चक्कर येऊन पडला. डॉक्टरांना बोलावून तात्काळ त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाची माहिती समोर आली आहे.
अचानक झालेल्या त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मॉडेलच्या टीममधील लोकांनी त्याची तब्येत अचानक बिघडली असल्याचं सांगितलं. मॉडेलच्या टीमने इंन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत ही दु:खद घटना शेयर केली आहे. आम्ही मृत मॉडेलच्या कुटुंबियांसोबत या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे आम्ही अतिशय दु:खी असून तो या जगात नसल्याच्या घटनेवर आमचा विश्वासच बसत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.