मुंबई : अतिशय लोकप्रिय आणि तितक्याच चर्चेत आलेल्या कलाकारावर गंभीर आरोप लावण्यात आल्यामुळे संपूर्ण कलाविश्वाला हादरा बसला आहे. एका डान्सरकडून 2020 मध्ये दाखल करण्यात आलेल्या केसमध्ये आता मुंबई पोलिसांनी आणखी एक चार्जशीट दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सेलिब्रिटी आहे, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य. एका महिला ट्रेनी डान्सरनं छेडछाड, पाठलाग करणं आणि आपल्या कामांमध्ये सतत डोकावण्याचा आरोप त्याच्यावर केला होता. गणेशनं आपल्याला बळजबरीनं पॉर्न फिल्म दाखवून अत्याचार करण्याचा  प्रयत्न केल्याचाही आरोप तिनं केला होता. 


सदर कृत्यांचा विरोध करण्यामुळं आपल्याला मारहाणही झाल्याचा धक्कादायक खुलासा तिनं केला. 


दरम्यान, अंधेरी मेट्रोपोलिटन न्यायालयात चार्जशीट दाखल केलेल्या पोलीस निरिक्षक संदीप शिंदे यांच्या माहितीनुसार आरोप पत्रात गणेश आचार्य आणि त्यांचे सहायक या दोघांवरही कलम 354-ए , 354-सी , 354-डी, 509, 323 आणि 504 अन्वये गंभीर आरोप लावण्यात आले. 



तक्रारकर्त्या महिलेनं गणेश आचार्य याच्या मनसुब्यांचा विरोध केल्यामुळं त्यानं आपल्याशी गैरव्यवहार केल्याचं म्हणत त्याच्या महिला सहायकानं आपल्याला मारहाण केल्याचंही माहिती दिली.


आपल्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचं म्हणत गणेश आचार्य यानं ते धुडकावून लावले आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या या प्रकरणाची चर्चा सुरु असून, आता याबाबत पुढे नेमकं काय घडतं, गणेश आचार्य खरंच कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.