मराठे धोक्यात ? छे...! `संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो`
भारावून टाकणारी बलाढ्य सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची झलक... आणि संभाजीराजेंचं अफाट सामर्थ्य....
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मोहिम हाती घेतली त्या क्षणापासून महाराष्ट्राच्या कडेकपारीत राजांचंच नाव निनादू लागलं. अफाट पराक्रमाची कास धरून या राजानं प्रजेला सुख दिलं, अभिमानानं जगायला शिकवलं आणि हाच वारसा पुढे नेला राजांचे चिरंजीव, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी. (chhatrapati sambhaji maharaj)
स्वराज्याच्या या मोहिमेची वाट अजिबातच सुकर नव्हती. खाचखळगे सोडाच पण, इथं वळणावळणावर शत्रूची वादळं घोंगावत होती. अशा परिस्थितीमध्ये राजांना अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांना साथ मिळाली ती आपल्या हक्काच्या माणसांची.
शत्रूच्या छाताडात स्वराज्याचा ध्वज रोवण्यासाठी सज्ज असणारं हे हक्काचं माणूस म्हणजे, सरसेनापती हंबीबरराव मोहिते. याच हंबीररावांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर उलगडला जाणार आहे.
इतिहासाचं एक सुवर्णमय पान उलटत पुन्हा एकदा नजर खिळवणारा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (sarsenapati hambirrao mohite)
छत्रपती संभाजी महाराज जयंतीचं औचित्य साधत या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला गेला आहे. या ट्रेलरमध्ये हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या कारकिर्दीदरम्यान स्वराज्यातील मोहिमा आणि त्या काळच्या घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. (sarsenapati hambirrao movie trailer)
चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी यानं संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारली आहे. अवघ्या दोन - अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये महाराष्ट्राचे शूर मावळे प्राणही पणाला लावून कसे गनिमांशी दोन हात करत होते, याची झलक पाहायला मिळते.
एक असलो तरी लाख आहोत... असं म्हणताना मराठ्यांच्या आत्मविश्वासाचीच प्रचिती इथं येत आहे. तर, संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गश्मीरच्या तोंडीही असेच संवाद असल्यामुळं हा ट्रेलर प्रदर्शित झाल्या क्षणापासूनच सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहे.
पुन्हा एकदा स्वराज्याची मोहिम, पुन्हा नमलेला शत्रू आणि एक साहसी गाथा घेऊन 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट 27 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.