मुंबई : समाजात अद्यापही न्यूनगंड असणाऱ्या अनेक विषयांवर कलाविश्वात साकारल्या जाणाऱ्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रकाश टाकला जातो. याच विषयांमधील अतीशय संवेदनशील मुद्दा हाताळत आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता या अभिनेत्री 'शीर कोर्मा' या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करत असून त्यांची एक वेगळी आणि तितकीच समर्पक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून याचीच एक झलक या चित्रपटातून पाहायला मिळत आहे. 


 LGBTQ शॉर्टफिल्म 'सिसक'साठी ओळखल्या जाणाऱ्या फराज आरिफ अन्सारी यांच्या 'शीर कोर्मा' या चित्रपटाची अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यामध्ये स्वरा पाकिस्तानी- कॅनेडियन वंशाच्या 'सितारा'च्या भूमिकेत दिसत आहे. तर, दिव्या दत्ता ही 'सायरा'च्या भूमिकेत दिसत आहे. 'सितारा' आणि 'सायरा'च्या प्रेमाच्या नात्याला दु:ख, समाजातील स्थान आणि कुटुंबातील विरोध या साऱ्याचा सामना करावा लागतो. पण, यामध्येही प्रेम करणं हा काही गुन्हा नाही, हा संदेशही तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात आल्याचं कळत आहे. 



पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत


जवळपास १० वर्षांहून अधिक काळासाठी रिलेशनशिपमध्ये असूनही सितारा आणि सायराच्या नात्याला मिळत नसणारी स्वीकृती, पुन्हा एकदा समलैंगिक संबंधांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाविषयी गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडते. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यासुद्धा झळकत आहेत. समलैंगिक संबंधांकडे अनैसर्गिक संबंधांच्या नजरेने पाहणाऱ्या एका आईची भूमिका त्यांनी साकारली आहे. अतिशय गंभीर आणि संवेदनशील मुद्द्यावर करण्यात आलेलं हे कलात्मक भाष्य प्रेक्षकांची दाद मिळवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.