बाली : आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात १९९४ मध्ये पदार्पण करत झी एंटरटेन्मेन्ट एंटरप्रायझेस लिमिटेड हा देशातील पहिला समुह ठरला होता. जवळपास २५ वर्षांनंतर याच समुहाकडून प्रेक्षकांच्या सर्वोत्तम सेवेसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कार्यक्रमांना एक वेगळी उंची मिळणार आहे. परिणामी प्रेक्षकांनाही मनोरंजनाची ही मेजवानी जवळपास पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फक्त भारताततच नव्हे तर बॉलिवूड चित्रपट आणि बहुविध प्रकारच्या भारतीय कार्यक्रमांच्या लोकप्रियतेचे पडसाद हे दक्षिण आशियाई देशांमध्येही पाहायला मिळतात. त्यामुळे मनोरंजनने आता सर्वच सीमा ओलांडल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही. याच धर्तीवर गुरुवारी झी फाईव्ह ग्लोबल ZEE5 Global यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत मनोरंजनाचा हा नजराणा आता एकूण १७ भाषांमध्ये प्रसारित केला जाणार आहे. ज्याव्यतिरिक्त पाच आंतरराष्ट्रीय भाषांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. 


ZEE5 Global कडून सांगण्यात आल्यानुसार या पाच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये मलय, थाय, बाहसा, जर्मन आणि रशियन या भाषांचा समावेश आहे. झी फाईव्ह ग्लोबलच्या वरिष्ट व्यवसाय अधिकारी अर्चना आनंद यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. इंडोनेशियातील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या एशिया पॅसिफिक व्हिडिओ ऑपरेटर्स समिट मधील ‘INDIA: OTT DRIVES BORDERLESS AMBITION’ या सत्रात त्यांनी ही घोषणा केली. 


ही एक महत्त्वाची संधी असल्याचं म्हणत या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रुंदावणाऱ्या या कक्षा पाहता मनोरंजन विश्वातील या खेळात आपण भक्कमपणे उभं असल्याचं म्हणत फक्त बळकटीकरणालाच प्राधान्य न देता आम्ही काही भाषांनाही प्राधान्य देत असल्याची प्रतिक्रिया झी इंटरनॅशनल आणि झी फाईव्हच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या अमित गोएंका यांनी दिली.