अमेरिकेत राहणं किती अवघड? भारतात परतलेल्या मृणाल दुसानीसनं सांगितला अनुभव
Mrunal Dusanis : मृणाल दुसानीसनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमेरिकेत राहण्याच्या तिच्या अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Mrunal Dusanis : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीसनं अनेक मालिकांमध्ये काम केलंय मृणालनं मराठी कला क्षेत्रात स्वत: चं एक वेगळं स्थान मिळवलं आहे. गेल्या बराच काळापासून मृणाल ही अभिनय क्षेत्रापासून लांब होती. आता तब्बल चार वर्षानंतर ती भारतात परतली आहे. यानिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत मृणालनं तिचा अमेरिकेतील अनुभव सांगितला आहे. त्याशिवाय तिचं करिअर आणि खासगी आयुष्य यावरही वक्तव्य केलं.
मृणालनं ही मुलाखत 'लोकमत फिल्मी'ला दिली होती. यावेळी मृणालनं तिच्या मुंबईतील घराची एक झलक दाखवली आणि त्यानंतर तिनं अमेरिका आणि भारताच्या राहणीमानावर आणि रोजच्या जिवनात येणाऱ्या गोष्टींविषयी वक्तव्य केलं आहे. मृणाल यावेळी म्हणाली की 'स्वयंपाकीच आवड मला हल्लीच निर्माण झाली. लोकांना काही वेगळं करुन खाऊ घालायला मला आवडू लागलं. आम्ही लहान असताना माझी आई जॉब करत होती त्यामुळे तिचा स्वयंपाक हा सकाळीच तयार असायचा. पण कधीतरी आई मला पोळ्या वगैरे करायला सांगायची. पण नीरजलाही स्वयंपाक येत असल्यानं माझा ताण हा मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्याचं कारण म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून तो अमेरिकेत आहे, त्यामुळे त्याला स्वयंपाक करायला आवडतो आणि त्याला तशीही स्वयंपाकाची आवड ही आहेच.'
यापुढे अमेरिकेतील राणीमानाविषयी बोलताना मृणाल म्हणाली की 'अमेरिकेत डिश वॉशर वगैरे या सुविधा असतात हे सगळं खरं आहे. पण तिथे राहणं हे भारतात राहण्यापेक्षा खूप कठीण आहे. त्याचं कारण म्हणजे इथे आपल्याकडे हाऊस हेल्प (मोलकरीण) मिळते. पण तिथे असं कोणीच नसतं. डिशवॉशरमध्ये भांडी ही आपल्यालाच लावावी लागतात. फर्निचर घेतलं तर ते आपल्यालाच जोडावं लागतं. पण महत्त्वाचं म्हणजे आपण मुळचे अमेरिकेचे नसल्यानं आपल्याला भारतातील गोष्टींची आणि कामाची ही सवय असते. त्यामुळे मला भांडी घासायला काही हरकत नव्हती. आता डिशवॉशर असलं तरी त्यात भांडी ही स्वच्छ होतील की नाही ही शंका असतेच. अमेरिकेत मला आवडायचं त्याचं कारण म्हणजे तिथे स्वच्छता असते, पण इथे माझी माणसं आहेत.'
दरम्यान, मृणालच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं 'तू तिथे मी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं. त्यानंतर मृणाल ही 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'अस्सं सासर सुरेख बाई' आणि 'हे मन बावरे' या मालिकांमध्ये दिसली होती. चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर मृणाल 'श्रीमंत दामोदर पंत' या सिनेमातही झळकली होती.