सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सुशांतने त्याच्या वांद्रातल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवर पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली आहे. संशयास्पद असं सध्या तरी काही हाती लागलेलं नाही, असं झोन ९ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले.
सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा तो घरात एकटाच नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते, अशी माहितीही समोर येत आहे. पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून काही कागदपत्र मिळाली आहेत, यामधून तो डिप्रेशनमधून जात होता, हे दिसत आहे.
सुशांतच्या आत्महत्येची बातमी कळताच अंकिता लोखंडे म्हणाली...
पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडियाचाही तपास केला जात आहे. सुशांत बऱ्याच कालावधीपासून सोशल मीडियापासून लांब आहे. सुशांतने शेवटचं ट्विट २७ डिसेंबर २०१९ ला केलं होतं. यानंतर तो ट्विटरवर ऍक्टिव्ह नव्हता. इन्स्टाग्रामवर त्याने शेवटची पोस्ट ३ जूनला केली होती. या पोस्टमध्ये त्याने आईचा फोटो शेयर केला होता.
काहीच दिवसांपूर्वी सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियननेही आत्महत्या केली होती.