मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. 5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सलमान खानला धमकी प्रकरणात चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात सलमानचे वडील आणि गीतकार सलीम खान (Salim Khan) यांचाही समावेश आहे. पोलीस आज सलमान खानचा जबाब नोंदवणार आहेत.


वांद्रे बॅंडस्टँडजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले जात आहेत. पण या प्रकरणी पोलिसांना अद्याप ठोस काहीही मिळालेले नाही. धमकीच्या पत्रात G B L B लिहिले होते. याचा अर्थ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आहे का मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत आहेत. महाराष्ट्रात या दोघांच्या टोळीतील सदस्यांचा तपशील पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.


सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. कडक कारवाई करत पोलिसांनी सलमानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy Apartment) बाहेर सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक 6 जून रोजी सकाळी सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. या ठिकाणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील आणि डीसीपी मंजुनाथ शेंगे यांनीही सलमानच्या कुटुंबीयांची आणि इतरांची चौकशी केली.


5 जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. हे पत्र मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड (Bandstand Promenade) येथे सलीम खान आणि त्यांच्या अंगरक्षकांना मिळाले होते. सलीम खान हे रोज सकाळी आपल्या अंगरक्षकासोबत मॉर्निंग वॉकसाठी जातात. फिरल्यानंतर त्यांची बसण्याची जागा निश्चित केली जाते. चालल्यानंतर सलीम खान बसलेल्या बेंचवर हे पत्र त्यांच्या अंगरक्षकाला दिसले. सलीम आणि सलमान खान यांची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.


या प्रकरणानंतर आता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा ही वाढवण्यात आली आहे. मुंबई पोलीस हे धमकीचं पत्र कोणी ठेवलं याबाबत तपास करत आहेत. पण सलमानला मिळालेल्या धमकीनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.