मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी लगेच अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसंच मुंबई पोलीस दबावात काम करत असल्याची टीकाही आठवले यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानची हत्या झाल्याचा आरोपही रामदास आठवलेंनी केला आहे. 'दिशाने घरी पार्टी बोलावली होती, मग ती आत्महत्या का करेल? दिशाची हत्या झाली आहे. तिने आत्महत्या केली असेल, तर सुसाईड नोट का मिळाली नाही?', असा सवालही आठवलेंनी उपस्थित केला आहे. दिशाच्या हत्येचा संबंध सुशांतच्या केसशी असू शकतो, अशी शंकाही आठवलेंनी व्यक्त केली आहे. तसंच दिशा सालियान प्रकरणाचा सीबीआयने तपास करावा, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे. 


राज्यसभेत खासदारांची गुंडगिरी


कृषी विधेयकावरुन राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवरही रामदास आठवलेंनी टीका केली. विरोधी पक्षातल्या खासदारांनी संसदेची मर्यादा ओलांडली आहे. खासदारांनी राज्यसभेत गुंडगिरी केली आणि संसदेचा अपमान केला. अशा खासदारांचं सदस्यत्व रद्द करणारा कायदा बनवण्यात आला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली. तसंच कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांनी जिंकवलं आहे, त्यामुळे ते शेतकऱ्यांची योग्य काळजी घेतील, असं रामदास आठवले म्हणाले.