`उमराव जान` फेम संगीतकार खय्याम रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक
ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
मुंबई : 'कभी कभी' आणि 'उमराव जान' यांसारख्या चित्रपटांसाठी अविस्मरणीय संगीत देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम(92) यांना सुजय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात त्यांना फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी यांनी वयाच्या 17व्या वर्षी पंजाबमधील लुधियाना शहरातून संगीत क्षेत्रात त्यांचा प्रवास सुरू केला.
'कभी-कभी' आणि ब्लॉकबस्टर 'उमराव जान'च्या जबरदस्त यशानंतर खय्याम यांच्या करियरला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि बॉलिवूडमध्ये त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
'नूरी', 'रझिया सुलतान', 'बाजार' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटात संगीताची अभेद्य छाप सोडणाऱ्या खय्याम यांना २०१० मध्ये 'जीवनगौरव' पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
कलाविश्वातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना फिल्म फेयरच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे.