हिंदी भाषेच्या सक्तीविषयी ए.आर. रेहमानचं लक्षवेधी विधान
हिंदी भाषिक नसणाऱ्या राज्यांमध्ये.....
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूसह काही दाक्षिणात्य राज्यांमधून केंद्रस सरकारच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त करण्य़ात येत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील कार्यकाळाच्या सुरुवातीला मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून एक महत्त्वाचा मसूदा मांडण्यात आला.
केंद्र सरकारच्या या मसूद्यात हिंदी भाषिक नसणाऱ्या राज्यांमधील शाळंमध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांच्या वापराची सक्ती करण्याचं म्हटलं गेलं होतं. या निर्णयाचा अनेकांनीच विरोध केला. सोशल मीडियावरही याचे थेट पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. हिंदी भाषेची सक्ती केल्याबद्दल हा अनेकांचाच रोष होता.
हिंदी भाषेविषयीचा हा मसूदा जाहीर केल्यानंतर अनेक स्तरांतून त्याचा विरोध झाला, ज्यामध्ये तामिळनाडू राज्याचाही समावेश होता. अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून त्यात काही बदल करण्यात आले आणि हिंदी भाषिक नसलेल्या राज्यांमध्ये हिंदी अनिवार्य नसल्य़ाचा मुद्दाही मांडण्यात आला. याविषयी आता कलाविश्वातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
विश्वविख्यात संगीत दिग्दर्शक ए.आर. रेहमानने या निर्णयाचं स्वागत करत, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं तो म्हणाला. शिवाय त्याने एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला. ज्यामध्ये एक पंजाबी गायक दाक्षिणात्य गाणं गाताना दिसत आहे. तमिळ भाषेचा पंजाबमध्येही प्रसार होत आहे, असं लिहित त्याने या गाण्याचा व्हिडिओ पोस्ट केला. फक्त रेहमानच नव्हे, तर अभिनेता सिद्धार्थ यानेही याविषयी एक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं होतं.